बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? कोण-कोण उपस्थितीत राहणार? उद्धव ठाकरे म्हणाले….
Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम काही दिवसांपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण झाले. यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. या टप्प्यात इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण झाली आहेत. या इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आज शुक्रवारी १० जानेवारी २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या स्मारकाला भेट दिली. या भेटीवेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? कोण-कोण उपस्थितीत राहणार? याची संपूर्ण माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांनी स्मारकाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे कामकाज कसे सुरु आहे, याबद्दल सांगितले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काम सुरु होईल. या दोन्ही टप्प्यांचं कामकाज 23 जानेवारी 2026 च्या आधी पूर्ण होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“स्मारकाचं काम सरकारच करत आहे”
“शिवसेनाप्रमुखांनी झाडांवर प्रेम केलं. त्यांचा स्मारक झाडं तोडून मला करायचं नव्हतं. तसेच महापौर बंगल्याच्या परिसरात नवं बांधकामही करायचं नव्हतं. त्यामुळेच आम्ही भूमिगत स्मारक तयार केलं. आमचं सरकार येईल असं म्हटलं नाही. मी फक्त उत्तर दिलं. श्रेयाची लढाई होऊ नये असं म्हटलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ते श्रेय घेऊ शकत नाही. सरकार सरकार असते. स्मारकाचं काम सरकारच करत आहे. आमची सरकारशी आजही चर्चा होत आहे”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
“भूमिपूजनाच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो”
मी म्हटलं ना मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचंच नाही. जे असेल त्यांचं श्रेय असेल. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलं आहे. बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत. त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं. या स्मारकाच्या उद्घाटनासाठी त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते येतील. उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. एनडीए असेल तर ते लोक येऊ शकतात. त्यावेळी जे सरकार असेल ते लोक येतील. भूमिपूजनाच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“नागरिकांना शुल्क आकारू नये”
यावेळी उद्धव ठाकरेंनी स्मारकात नागरिकांना शुल्क आकारू नये अशी इच्छा आहे. एमएमआरडीएकडून स्मारक केलं जात आहे, असेही सांगितले. दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय या दालनांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी प्रसाधनगृह आणि देखभाल कक्षही आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List