बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली
बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. मात्र हिंदुस्थानने त्यांचा व्हिसा वाढवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केलं आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदुस्थानकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. याशिवाय हसीना यांची चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानात बांगलादेशच्या तपास पथकाला येऊन द्यावं, अशी विनंतीही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. याबाबत माहिती देताना बांगलादेशचे मेजर जनरल (निवृत्त) एएलएम फजलुर रहमान यांनी म्हटले आहे की, ”2009 मध्ये 74 लोकांच्या हत्येशी संबंधित एका कथित प्रकरणात हसीना यांची चौकशी करण्यासाठी तपास पथक हिंदुस्थानात येऊ इच्छित आहे.”
दरम्यान, गेल्या वर्षी 5 जून रोजी बांगलादेशातील उच्च न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये 30 टक्के कोटा प्रणाली लागू केली होती. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना हे आरक्षण दिले जात होते. यानंतर ढाका येथील विद्यापीठांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन सुरु केलं. नंतर हे आंदोलन देशभर पसरलं. पुढे हे आरक्षण रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. काही वेळातच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. या विरोधानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून हिंदुस्थानात आश्रय घेतला. यानंतर येथे अंतरिम सरकार स्थापन झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List