Australia Seaplane Crash: रॉटनेस्ट बेटावरून उड्डाणा दरम्यान सी-प्लेन कोसळले, पायलटसह तीन जणांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील एका पर्यटन बेटाजवळ सी प्लेन कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पायलटसह स्वित्झरलॅण्ड आणि डेन्मार्कच्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली.
मंगळवारी दुपारी पर्थच्या पश्चिमेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या रॉटनेस्ट आयलँड या लोकप्रिय पर्यटन स्थळाजवळ विमान कोसळले तेव्हा सहा पर्यटक विमानात होते. या अपघाताप्रकरणी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्याचे प्रीमियर रॉजर कुक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, हा अपघात पर्यटकांसमोर घडला, ज्यात बेटावर मुलांसह सुट्टी घालवणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. राज्याचे पोलीस आयुक्त कर्नल ब्लँच म्हणाले की, स्वान रिव्हर सीप्लेन्सच्या मालकीचे हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी पर्थ येथील तळावर परतत होते, रॉटनेस्ट बेटाच्या पूर्वेला 30 किलोमीटर अंतरावर होते. त्या दरम्यान हा अपघात घडला.
ऑस्ट्रेलियाची विमान अपघात तपास संस्था, ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो (ATSB) ने सांगितले की, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी तज्ञ तपासकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. एटीएसबीला कळवल्याप्रमाणे, ब्यूरोचे मुख्य आयुक्त एंगस मिशेल यांनी बुधवारी एका निवेदनात सांगितले की, फ्लोटप्लेन टेकऑफच्या वेळी पाण्यावर आदळले आणि नंतर अर्धवट पाण्यात बुडाले. तर ग्रेग क्विन या रॉटनेस्टमध्ये सुट्टी घालवणाऱ्या पर्यटकाने हा विमान अपघात पाहिला. क्विन यांनी पर्थमधील ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन रेडिओला सांगितले की, आम्ही सीप्लेनचे उड्डाण पाहत होतो आणि ते पाण्यातून उतरू लागले असतानाच ते उलटले आणि ते कोसळले.पाण्यात असलेल्या अनेकांनी त्यांच्या बोटीतून घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List