17 मिनिटांच्या इंटिमेट सीनवरून हंगामा, थेट अभिनेत्रीच्या वडिलांकडून फोन; राम कपूर म्हणाला “माफी..”
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. राम कपूरने बरंच वजन कमी केलं असून आता तो अधिक फिट आणि हँडसम दिसतोय. मात्र या बदललेल्या लूकसोबतच ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेतील त्याच्या लूकची प्रेक्षकांना खास आठवण आली आहे. यामध्ये त्याने अभिनेत्री साक्षी तंवरसोबत भूमिका साकारली होती. या मालिकेतील राम आणि साक्षीच्या एका इंटिमेट सीनमुळे निर्माती एकता कपूरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मालिकेत असे बोल्ड सीन्स सहसा दाखवले जात नव्हते. त्यामुळे एकतासह कलाकारांनाही प्रेक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम कपूरने या सीनबाबतचा किस्सा सांगितला.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राम म्हणाला, “एक अभिनेमा म्हणून माझं जे काम आहे ते करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी कोणालाच स्पष्टीकरण देण्यासाठी बांधिल नाही. स्क्रिप्ट जशी लिहिली असेल त्याला तसं मी फॉलो करतो. हे मी करू शकत नाही, असं मी कसं म्हणू शकतो. एक अभिनेता असं म्हणू शकत नाही. त्यामुळे मी काहीच चुकीचं केलं नाही. निर्माती एकता कपूरने तो सीन लिहिला होता आणि आम्ही तो सीन करावा अशी तिचीच इच्छा होती. मी एकताला विचारलं की, ‘तुला खात्री आहे का?’ कारण ते टेलिव्हिजनवर आधी कधीच झालं नव्हतं. टेलिव्हिजनवरील तो पहिला किसिंग सीन होता. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती.”
“कुटुंबातील तिन्ही पिढ्या आमची मालिका बघायचे. पण एकता त्या सीनबद्दल खूप कॉन्फीडंट होती. तिला तो सीन मालिकेत दाखवायचा होता. मग मीसुद्धा ठीक आहे म्हणालो. पण त्याआधी मी माझ्या पत्नीला त्याबद्दलची कल्पना दिली. त्यानंतर मी साक्षीला म्हणालो की, जर तुला हा सीन करण्यात काही समस्या असेल तर मी एकताशी बोलतो”, असं रामने पुढे सांगितलं. साक्षीच्या कुटुंबीयांनीही विश्वास दाखवल्याचं रामने सांगितलं.
साक्षीच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेबद्दल रामने पुढे सांगितलं, “साक्षीच्या वडिलांना मला खूप चांगली गोष्ट सांगितली. मी माझ्या सहकलाकारांसोबत दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू शकत नाही. साक्षीच्या वडिलांनी मला फोन केला आणि म्हणाले की, राम तू आहेस तर सर्व ठीक आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे आम्ही तो सीन आत्मविश्वासाने करू शकलो. आम्हाला तो सीन करण्यासाठी दोन रात्र घालवावे लागले. पण नंतर निर्माती एकताला त्याचे परिणाम भोगावे लागले.”
एकता कपूरच्या मालिकेतील या बोल्ड सीनवरून तुफान टीका झाली होती. कुटुंबातील सर्व पिढ्या अशा मालिका बघताना त्यात इतका बोल्ड सीन का द्यावा, असे सवाल अनेकांनी उपस्थित केले होते. इतकंच नव्हे तर या बोल्ड सीनचा परिणाम पुढे जाऊन मालिकेच्या टीआरपी रेटिंगवरही झाल्याची कबुली एकताने दिली होती. लिपलॉक सीनच्या आधी मालिकेची रेटिंग सहा आणि पाच अशी होती. मात्र त्या इंटिमेट सीननंतर ही रेटिंग थेट दोनवर आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List