लक्षवेधक – एसबीआयमध्ये 150 जागांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी भरती 3 जानेवारीपासून सुरू झाली असून 23 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची डेडलाईन आहे. या भरती मोहिमेद्वारे पात्र उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. एसबीआयच्या वेबसाइटवर भरतीसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी
रेल्वे भरती मंडळाने विविध ट्रेडमध्ये शिकाऊ पदांसाठी 4,232 रिक्त जागा भरण्याचे जाहीर केले. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अखेरची डेडलाईन 27 जानेवारी 2025 पर्यंत आहे. 10 वी उत्तीर्ण तरुणांना एअर कंडिशनिंग, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, चित्रकार, वेल्डर पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहेत. उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 24 वर्षे असायला हवे.
इन्फोसिसमधील पगारवाढ पुढे ढकलली
हिंदुस्थानातील आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच जानेवारी ते मार्च पर्यंतची कर्मचाऱयांची वार्षिक पगारवाढ पुढे ढकलली आहे. कंपनीने शेवटची पगारवाढ नोव्हेंबर 2023 मध्ये लागू केली होती. इन्फोसिस कंपनीप्रमाणे प्रसिद्ध आयटी कंपन्या एचसीएल टेक, एलटीआय माइंडट्री आणि एल अँड टी टेक सर्व्हिस यांनीसुद्धा व्यवस्थापन करण्यासाठी, नफा राखण्यासाठी दुसऱ्या तिमाहीतील पगारवाढ वगळली आहे.
17 जानेवारीला ‘सत्या’ रि-रिलीज
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित प्रसिद्ध चित्रपट ‘सत्या’ येत्या 17 जानेवारीला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जे. डी. चक्रवर्ती, मनोज वाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे अनेकांनी कौतुक केले होते. ‘सत्या’ हा गँगस्टर जॉनरचा सर्वात प्रभावी चित्रपट मानला जातो. त्यामुळे मोठय़ा पडद्यावर पुन्हा एकदा गुंडगिरी आणि गँगस्टरचा धुमाकूळ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List