लेख – वाचनालये साहित्य व संवादाची केंद्रे व्हावीत
>> दिलीप देशपांडे, [email protected]
प्रत्येक तालुक्यात एक ग्रंथालय साहित्य संवादाचे केंद्र मानून पुस्तकांचे गाव निर्माण व्हायला हवे आहे. जिथे वाचन आणि पुस्तकांचे खरेदी केंद्र व साहित्यिक कार्यक्रमाचा अड्डा, कट्टा व्हावा. शासनाने त्यात सहभागी व्हावे. जसे की, गेल्या वर्षापासून पुण्याला मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामुळे असंख्य पुस्तके बघायला मिळतात, तसेच विकत घेता येतात. अशा प्रकारचे पुस्तक महोत्सव प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी वाचनालयाकडून आयोजित करता येतील. जेणेकरून तेथे साहित्य उपलब्ध असेल आणि संवादही प्रस्थापित होईल हे महत्त्वाचे.
वाचन संस्कृतीचा विषय चर्चेत आल्यानंतर अनेक प्रश्न डोळय़ांसमोर उभे राहतात. मग हल्ली एकूणच वाचनाची आवड कमी झालीय का? नसेल तर कुठल्या प्रकारचे वाचन होतेय? कुठल्या माध्यमातून होतेय? म्हणजे वाचनात कुठल्या माध्यमाचा वापर जास्त होतोय? शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसाधारण पुरुष व महिला वाचक, पन्नासच्या आतील आणि त्यावरील असे भाग करता येतील. ते काय वाचतात? कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित, विज्ञानविषयक, ऐतिहासिक, संत साहित्य, प्रवास वर्णन, बाल साहित्य, मासिक, दिवाळी अंक, वर्तमानपत्र अशा अनेकविध प्रकारांचा विचार त्यात येतो.
गेल्या काही वर्षांत मोबाईल, दूरचित्रवाणी, संगणक व त्यावरील गेम अशा साधनांच्या वाढलेल्या वापरामुळे वाचनाचा वेळ फार मोठ्या प्रमाणात विभागला गेला, हे सत्य नाकारून चालणार नाही. मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर, यूटय़ूबमध्ये जास्त वेळ खर्च होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. ई-बुक वाचणारा वर्ग आहे, पण तसा तो जास्त नाही सिमितच आहे. त्यामुळे साधारणपणे 16 ते 30/35 या वयोगटातील वाचनाची आवड तशी कमी झाल्याचेच दिसून येते. काही वर्षांपूर्वी नॅशनल बुक ट्रस्टच्या सर्वेक्षणात 46 लाख युवकांत फक्त 9 लाख युवकच वाचन करत असल्याचे निदर्शनास आले होते. आता तर त्या परिस्थितीत अजूनही बदल झाला असावा.
वाचन समृद्धीसाठी अनेकविध प्रकारे व वेगवेगळय़ा पातळींवरील प्रयत्न केले जातात, सर्वेक्षण केले जाते, योजनांची आखणी केली जाते. ग्रंथालयांना अनुदानही दिले जाते. अनेक ग्रंथालये सक्षम आहेत. स्वतःची इमारत आहे. मंगल कार्यालये आहेत. व्यापारी संकुल आहेत. परंतु वाचनालयांच्या कार्यकारी मंडळाच्या निष्क्रियतेमुळे, मुळातच त्यांना वाचन व साहित्यविषयी गोडी नसल्यामुळे अशी ग्रंथालये साहित्यिक अड्डे होऊ शकली नाहीत. राजकारणाचा शिरकाव होऊन राजकीय अड्डे मात्र झाली आहेत. वाचनालयाच्या निवडणुका समोर ठेवून कोणाला कोणत्या प्रकारचे सभासदत्व द्यायचे इथपासून निर्णय घेतले जातात, ही शोकांतिका आहे.
खरं तर आज प्रत्येक तालुका आणि जवळपास 70 ते 80 टक्के ग्रामीण भागात ग्रंथालये आहेत. त्यांना ग्रामविकास निधीतून सहाय्य मिळत असते, पण त्याचा फायदा घेतला जात नाही. ग्रामीण भागात तर वाचनाची फारच दुरवस्था आहे. अनेक ग्रंथालयांत पुस्तके पडून आहेत. कारण ती ग्रंथालये बंदच असतात. ज्यांच्याकडे काम सोपावलेले असते तेच उदासीन असतात. वेळ मिळेल तेव्हा उघडतात. त्यामुळेच वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत.
शाळा, कॉलेजमधून पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना इतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. चरित्रे, आत्मचरित्रे, विज्ञान आणि अनेक प्रेरणादायी पुस्तकांची ओळख करून द्यायला हवी. शाळा, महाविद्यालयातही पुस्तक प्रदर्शने भरवली पाहिजेत. साहित्यिकांची ओळख, त्यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजनातून विद्यार्थ्यांची आवड वृद्धिंगत करायला हवी. वेळोवेळी विद्यार्थ्यांना कुठली पुस्तके वाचावीत याचे मार्गदर्शन करायला हवे तरच हे शक्य आहे. खूप साऱ्या पुस्तकांनी ही वाचनालये समृद्ध असतात. ‘वाचाल तर वाचाल’, ‘वाचनाने मन समृद्ध होते’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’, ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे’ अशी वाचनाची महती सांगणारी वाक्ये लावलेली दिसतात. त्याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही. एकूणच विद्यार्थ्यांचा वाचनाचा कल कमी झाल्याचे जाणवते.
आज शहरी भागात जसे नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सा. वा. नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी, पुण्यात-पुस्तक पेठ, अक्षरधारा, म. सा. प. राजहंस, मेहेता, मुंबईत-ग्रंथाली, मराठी ग्रंथ संग्रहालय, जळगावला व. वा. वाचनालय आणि ठाणे, नागपूर, अकोला, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व बऱ्याच जिल्ह्यांच्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रमाची केंद्र आहेत. तिथे पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक कार्यक्रम नेहमी होत असतात. बदलापूरचे पाच हजार सभासद असलेले ‘ग्रंथसखा’ वाचनालय एक उत्तम उदाहरण आहे. डोंबिवलीत ‘पै फ्रेन्ड’ वाचनालय आहे.
तालुका पातळीवर पुस्तकाची अशी दुकाने जवळपास नाहीतच. माझ्या तरी पाहण्यात नाही. क्वचित अपवाद असावा. त्यामुळेच वाचकापर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत. ग्रंथालय आहेत, पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती त्या-त्या ठिकाणच्या कार्यकारी मंडळाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते.
काही वर्षांपूर्वी अक्षरधाराने बऱ्याच ठिकाणी पुस्तक प्रदर्शने आयोजित केली होती. तसेच ग्रंथालीनेही महाराष्ट्रात वाचक चळवळ राबवली. अनेक केंद्रे उघडून वाचकांपर्यंत पुस्तके नेलीत. ‘मराठी वाचा-मराठी वाचवा,’ ‘गोड बोला मराठीत’चा संदेश दिला. निम्म्या किमतीत पुस्तके दिलीत. महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शने भरवली. अजूनही अक्षरधारा, ग्रंथालीचे कार्य सुरू आहे. मीही त्या चळवळीत सहभागी होतो.
प्रत्येक तालुक्यात एक ग्रंथालय साहित्य संवादाचे केंद्र मानून पुस्तकांचे गाव निर्माण व्हायला हवे आहे. जिथे वाचन आणि पुस्तकांचे खरेदी केंद्र व साहित्यिक कार्यक्रमाचा अड्डा, कट्टा व्हावा. शासनाने त्यात सहभागी व्हावे. जसे की, गेल्या वर्षापासून पुण्याला मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामुळे असंख्य पुस्तके बघायला मिळतात, तसेच विकत घेता येतात. अशा प्रकारचे पुस्तक महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वाचनालयाकडून आयोजित करता येतील. जेणेकरून तेथे साहित्य उपलब्ध असेल आणि संवादही प्रस्थापित होईल हे महत्त्वाचे.
महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ ‘भिलार’ या ‘पुस्तकाचे गाव’ची निर्मिती केली. पुस्तकाचे गाव बसविणे ही संकल्पना चांगली आहे, पण असे एक गाव बसवून चालणार नाही. पुस्तकांची अशी अनेक गावे महाराष्ट्रात निर्माण व्हायला हवीत. या गावांना भेट देऊन, तिथे जाऊन चांगल्या पुस्तकांचे वाचन व पुस्तक खरेदी हा हेतू साध्य होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते पुस्तकांचेच गाव व्हायला हवे. त्याचे पर्यटनस्थळ मात्र व्हायला नको हा विचार पुस्तकाचे गाव निर्माण करते वेळी करायला हवा. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता झाली, परंतु अद्याप याविषयी काही कार्यवाही दिसत नाही किंवा त्याविषयी सांस्कृतिक विभागाकडून धोरण जाहीर झाले नाही व कुठल्या जिल्ह्याची कुठली गावे निवडली गेली तेही समजले नाही. त्याविषयी शक्य तेवढय़ा लवकर कार्यवाही होणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचा विचार पूर्णत्वास जावा व अशी पुस्तकांची गावे निर्माण होऊन वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List