’10×10 च्या खोलीत जीव गुदमरायचा..’; ‘सुख म्हणजे..’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनराव याने नुकतंच मुंबईत हक्काचं घर घेतलंय. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र ते स्वप्न पूर्ण करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. खिशात फक्त 1500 रुपये घेऊन कपिल मुंबईत अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी आला होता. तेव्हा तो भांडुपमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत राहायचा. या खोलीत राहताना जीव गुदमरल्यासारखा व्हायचा, असं त्याने म्हटलंय. इन्स्टाग्रामवर घराचा व्हिडीओ पोस्ट करत कपिलने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने घर घेतल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
कपिल होनरावची पोस्ट-
‘मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि तेही अंधेरीसारख्या ठिकाणी . 4 कपडे, एक छोटीशी बॅग आणि खिशात 1500 रुपये घेऊन गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या पोरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडुपला दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहताना जीव गुदमरल्यासारखा व्हायचा माझा. काडीपेटीसारखी घरं वाटायची. असं वाटायचं की यार कुठे आलोय आपण. मुंबई फिल्ममधे जशी पाहतो तशी नाहीये, कुठे राहतोय आपण. ऑडिशनसाठी अंधेरीला यायचो तेव्हा मोठ्या मोठ्या इमारती पाहिलं की वाटायचं यार ही खरी मुंबई.. इथे घर असलं पाहिजे. ऑडिशन झालं की मित्रांसोबत फिरताना उगाच बोलायचो की इथे घर घेईन मी, तू तिथे घे. पण त्यावेळी ते फक्त दिवा स्वप्न असायचं. ही मुंबई लगेच आपलंसं नाही करत तुम्हाला. खूप परीक्षा घेते. तुमचं टेंपरामेंट चेक करते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावंसं वाटायचं,’ असं त्याने लिहिलंय.
या पोस्टमध्ये त्याने पत्नी रेणुचेही खूप आभार मानले आहेत. याविषयी त्याने पुढे लिहिलं, ‘माझ्यासोबत कायम एक खंबीर मुलगी होती. अगदी सुरुवातीपासून. आज या मुंबईत आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबतीमुळे आहे आणि हे घरसुद्धा तिच्या सोबतीशिवाय शक्यच झालं नसतं. पैसे आले की उधळपट्टी करणारा मी.. पण एक-एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली. रेणू आज मला खूप आनंद होतोय की तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देतोय. हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि या फाटक्या पोराचा हात ज्या विश्वासाने तू धरलास. आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस. त्याने लग्नानंतर 5 वर्षात, इतक्या कमी वयात करोडोंच्या वरचं घर घेतलं. तू नेहमी बोलतेस ‘आप खुद पे विश्वास करो, आप कर लोगे’. आज मला खूप आनंद होतोय की तुझा विश्वास मी सार्थ ठरवला.’ कपिलच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List