देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. देशात अनेक गृहमंत्री झाले, पण त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते, असा टोला शरद पवार यांनी शहा यांना लगावला. गुजरातमध्ये राहता येत नव्हते तेव्हा शहांनी ‘मातोश्री’वर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली होती, याचीही आठवण पवार यांनी करून दिली.
शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शहा यांची टीका, ‘इंडिया’ व महाविकास आघाडी तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी अनेक राजकीय दाखले दिले.
शरद पवार म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, गोविंद वल्लभ पंत यांनी केंद्रीय गृहमंत्री असताना त्या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ठेवली. त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते. तो प्रसंगच कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. गुजरातमध्येही अनेक उत्तम प्रशासक होऊन गेले असे सांगत शरद पवार यांनी, बाबूभाई, माधवराव सोळंकी, चिमणभाई पटेल यांची उदाहरणे यावेळी दिली. त्यापैकीही कुणाला कधी त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नाही, असे शरद पवार यांनी आवर्जून सांगितले.
तुमचे खासदार भाजपसोबत जाणार ... हा जावईशोध कुणी लावला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे, तुमचे व्यक्तिगत मत काय, असाही एक प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार थोडेसे संतापूनच म्हणाले की, यात कसले व्यक्तिगत आले? आमच्या एकाही खासदाराचे वेगळे मत नाही. माध्यमांनी असा जावईशोध कुठून लावला हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.
शहा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा ‘मातोश्री’वर मदत मागायला आले होते
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शहा यांनी वक्तव्य केले होते. त्याचा उल्लेखही शरद पवार यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे त्यावर त्यांचे मत व्यक्त करतील, पण एकेकाळी हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, असे शरद पवार म्हणाले. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद त्यांच्या पक्षात किती घेतली हे न सांगितलेले बरे, असेही शरद पवार म्हणाले.
1978 साली शहा राजकारणात तरी होते का?
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांचे 1978 पासूनचे दगाफटक्याचे राजकारण 20 फूट खोल खड्डय़ात गाडले असे वक्तव्य अमित शहा यांनी शिर्डीत केले होते. अमित शहा यांचा नामोल्लेख न करता शरद पवार यांनी 1978 चा इतिहासच मांडला. ते म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांनी माहिती घेऊनच बोलायला हवे. 1978 साली ते राजकारणात कुठे होते मला माहीत नाही, पण त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्ववान लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. याशिवाय वसंतराव भागवत, प्रमोद महाजन यांनी जनसंघात राहून आम्हाला सहकार्य केले होते, असे शरद पवार म्हणाले.
‘इंडिया’ आघाडी केवळ लोकसभेसाठी
‘इंडिया’ आघाडी एकत्र असूनही दिल्ली विधानसभेला ‘आप’ आणि काँग्रेस विरोधात लढत आहेत असे यावेळी माध्यमांनी शरद पवार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, ‘इंडिया आघाडी केवळ लोकसभेसाठी होती. राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका एकत्र लढण्याबाबतची चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्रे याची नोंद घेत आहेत त्यावरून राष्ट्रीय पातळीवरील भूमिकांमध्ये एकत्र राहण्याची भूमिका घेतली पाहीजे, असे वाटत आहे. आमच्या पातळीवर असा निर्णय घेऊ. राज्याच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी करायची की नाही? याबाबत येत्या आठ-दहा दिवसांत तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील,’ असे शरद पवार म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आला. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी होत आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार हे काहीच निर्णय घेत नाहीत असा मुद्दा माध्यमांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर शरद पवार यांनी, राज्याचे प्रमुख म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे, असे उत्तर दिले. महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहे त्याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती माहिती गृहखात्याकडेच असते, असे शरद पवार म्हणाले. परिणामांची चिंता न करता राज्यकर्त्यांनी वस्तुस्थितीवरून तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे शामभटाची तट्टाणी
1978 नंतरच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते, पण राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सुसंवाद होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी कधीही अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केले नाही. गुजरातमध्ये भूजला भूपंप झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली होती. आपात्कालीन व्यवस्थापनाचे धोरण ठरवले पाहिजे यावर त्यात एकमत झाले. मी विरोधी पक्षात असताना मंत्रीपदाचा दर्जा देऊन वाजपेयींनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. ही पार्श्वभूमी भाजपच्या जुन्या नेतृत्वाची आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केले त्यावर न बोललेलेच बरे. मराठीत म्हण आहे ना, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, अशी खिल्ली पवार यांनी उडवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List