बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार, अजित पवार गटाच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर निशाणा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अठरा दिवस उलटले असून अद्यापही काही आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली नाही. यातच हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच प्रकरणावरून आता अजित पवार गटातच वाद निर्माण होताना दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार, असल्याचं म्हणत त्यांनी मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश सोळंके म्हणाले की, ”बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती समाधानकारक नाही. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंधे सुरु आहेत. यात वाळूचा उपसा, मद्य विक्री अशा धंद्यांमुळे काही लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा येतो. याच पैशाच्या माध्यमातून गुंडगिरी केली जाते, ही सध्या बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे. यातूनच खंडणी मागणी, खून करणे, हे प्रकार पुढे आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन किंवा इतर सरकारी खाती असतील, या सर्व खात्यांवर दबाव ठेवून काम केलं जात आहे. बडे अधिकारी, पोलीस प्रशासन यांचे बटीक असल्यासारखे काम करत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे नोंदवले जातात, कोणालाही उचलून अटक केली जाते, असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यात सुरू आहेत.”
प्रकाश सोळंके म्हणाले, ”गेल्या अडीच वर्षापासून या जिल्ह्याचे नेतृत्व कोण करत (धनंजय मुंडे) आहेत? त्यांचं नाव घेतलं पाहिजे असं नाही. यातच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड त्यांच्यामाध्यमातून हे सुरू आहे. कुठे ना कुठे या सर्व प्रकाराला आमच्या जिल्ह्यातील नेतृत्वच जबाबदार आहे, असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही.”
ते पुढे म्हणाले, ”संतोष देशमुख यांच्या खुनाला अठरा दिवस झाले आहेत. अजून सगळे आरोपी पकडण्यात आले नाहीत. खंडणीच्या गुन्हातील आरोपी अद्याप फरार आहे. अठरा दिवस उलटूनही आरोपींना अटक करता येत नसेल, तर यामागे काय कारण आहे, हे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी सांगावं. यात नेमकी काय अडचण आहे? आरोपींना अटक का होत नाही? आम्ही प्रशासनात नसल्याने आम्ही याची उत्तरे देऊ शकत नाही. या लोकांचा प्रशासनावर अंकुश आहे, यांनीच याची उत्तरे द्यायला हवीत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List