विठ्ठलाच्या ऑनलाईन पूजेची मार्च 2025 पर्यंत बुकींग फुल, महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून, दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा यांची ऑनलाइन नोंदणी दि. 26 डिसेंबर पासून सुरु करण्यात आली. या नोंदणीस भाविकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दि. 31 मार्च 2025 पर्यंतच्या श्री विठ्ठलाच्या नित्य पूजेची बकींग फुल झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिर समितीच्या वतीने दि. 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात आली होती. याद्वारे पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील पुजा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 पासून दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2025 या कालावधीतील दुस-या टप्प्यातील पुजा उपलब्ध करून दिल्या होत्या. सदर कालावधीत उपलब्ध झालेल्या पुजेमधून विठ्ठलाच्या संपूर्ण नित्यपुजेची नोंदणी झाली आहे. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व तुळशीपूजा देखील नोंदणी झाल्या आहेत. यामधून मंदिर समितीला आतापर्यंत 41 लाख 93 हजार इतके देणगी मुल्य मिळाले आहे.
तसेच दुस-या टप्प्यातील दोन्ही कडील पाद्यपुजा, तुळशीपूजा व रूक्मिणीमातेच्या नित्यपुजा अजूनही नोंदणीसाठी शिल्लक असून, https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून भाविक भक्तांनी आवर्जून पूजेची नोंदणी करावी. दुस-या टप्प्यात देखील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, महाराष्ट्र राज्यासह आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यातून पूजा नोंदणी झालेली आहे. ऑनलाईन पध्दतीने पुजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पुजा नोंदणी करता येत आहे, याबाबत भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत असल्याचे व्यवस्थापक मनेाज श्रोत्री यांनी सांगीतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List