आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला

आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला

डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला, अशी भावना देशभरातून व्यक्त होत आहे. देशाचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली 1991मध्ये बुडणारी अर्थव्यवस्था सावरली होती. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. देश मोठय़ा आर्थिक संकटातून जात असताना त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत अर्थव्यवस्थेत अमुलाग्र सुधारणा केल्या. आर्थिक उदारीकरणाचे अनेक निर्णय घेतले आणि परदेशातील गुंतवणूक वाढवून देशाला जागतिक बाजारपेठेशी जोडले. त्यांच्या धोरणामुळे लायसन्स राज संपले आणि व्यापार तसेच उद्योगांना नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते. त्यांनी खासगीकरणउदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली

व्हीलचेअरवरून लोकसभेत आले

लोकसभेत एकदा मतदानावेळी विजय विरोधकांचा होणार हे माहिती होते. मतांचे अंतरही जास्त होते. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांनी व्हीलचेअरवर येऊन मतदान केले होते. जेव्हा कमिटीची निवडणूक होती तेव्हाही ते व्हीलचेअरवर मतदान करायला आहे. ते कुणाला ताकद द्यायला आले हा प्रश्न नाही. परंतु, ते लोकशाहीला ताकद देण्यासाठी आले होते. त्यामुळे मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

मनमोहन सिंग यांची कारकीर्द

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात आले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सपर्ह्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. 1966 ते 1969 या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांत काम केले. नंतरच्या काळात ते हिंदुस्थान सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात हिंदुस्थान सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदावर काम केले. 1996 साली सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर सिंग यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान पद भूषवले. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

भूकबळी ठरू नये म्हणून खाद्य सुरक्षा कायदा

कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी खाद्य सुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा हीसुद्धा त्यांच्याच कार्यकाळाची देणगी. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी 100 दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत तसेच अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली.

मितभाषी, संवेदनशील आणि विद्वान नेते

मनमोहन सिंग तब्बल 33 वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे दहा वर्षे देशाचा राज्य कारभार सांभाळू शकले. विरोधकांकडून अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ले होऊनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले. ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान राहिले.

असा सज्जन राजकारणी होणे विरळाच

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. आमच्या निवासस्थानी त्यांची आणि माझी भेट झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर इतकी टीका होऊनही देशाचा पंतप्रधान कशाप्रकारे नम्र, थोर राहू शकतो याचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यांच्यामुळे माझ्यासारख्या नव्वदीत जन्मलेल्यांना मोठे होताना प्रत्येक दिवस नवीन भासत गेला आणि जग आमच्या आणखी जवळ येत गेले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर आणि देशावर प्रचंड मोठा प्रभाव राहणार आहे. त्यांनी आपले राष्ट्र खऱ्या अर्थाने जगाच्या व्यासपीठावर नेऊन ठेवले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर अनेक निराधार टीका झाल्या, परंतु इतिहास दयाळूच राहणार आहे. सर्व हिंदुस्थानींना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्यासारख्या व्यक्तीचा देशाला वारसा लाभल्यामुळे वर्तमानकाळही दयाळूच राहील. राजकारणात शिखरावर असूनही असा सज्जन राजकारणी होणे विरळाच. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो… ओम शांती!

आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख

नोटाबंदीवरून मोदींवर साधला होता निशाणा

डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. नोटाबंदी म्हणजे देशाची संघटित लूट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर तत्काळ उपाय शोधायला हवा. नोटाबंदीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. छोटे उद्योजक आणि व्यापारी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले. रोजगार निर्मितीही थंडावली. नोटाबंदीच्या माध्यमातून 90 टक्के काळा पैसा परत पांढरा होऊन व्यवस्थेत आला. त्यामुळे नोटाबंदी ही एकप्रकारे देशाची संघटित लूटच आहे, असे त्यांनी म्हटले होते.

श्रद्धांजली

मनमोहन सिंग हे एक दुर्मिळ राजकारणी होते. त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासनाच्या विश्वालादेखील तितक्याच सहजतेने आपलेसे केले. त्यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशसेवा, उत्तम राजकारणी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. मी देशाच्या महान सुपुत्रांपैकी एक अशा मनमोहन सिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे कुटुंब, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते.

द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

n माजी पंतप्रधान प्रतिष्ठत अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झाले. 1991 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त, हिंदुस्थानच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार तथा एका गंभीर प्रसंगातून देशाला धैर्याने चालवणाऱ्या मनमोहन सिंग यांनी विकास आणि समृद्धीचे नवीन मार्ग उघडले. अर्थव्यवस्थेबद्दलची त्यांची प्रगल्भ समज, सौम्य वागणूक आणि देशाच्या प्रगतीसाठी असलेली बांधिलकी माझ्या स्मरणात कायमस्वरूपी राहील.

जगदीप धनखड, उपराष्ट्रपती

n माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. भारतीय रिझर्व बँकेचा गव्हर्नर ते देशाचा अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी हिंदुस्थानच्या शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.

अमित शहा, गृहमंत्री

n मनमोहन सिंग यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची असलेली सखोल जाण यातून देशाला प्रेरणा मिळते. श्रीमती काwर आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यापैकी लाखो जण त्यांना अभिमानाने आठवणीत ठेवतील.

राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

n भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढय़ांसाठी अक्षय्य प्रेरणास्रोत राहील. ईश्वर डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार)

n डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी राजकारणी आणि अर्थतज्ञ गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाने कोटयवधी देशवासियांच्या जीवनात बदल घडवून आणला. त्यांनी हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढून अक्षरशः मध्यमवर्ग निर्माण केला. मी एक आजीवन ज्येष्ठ सहकारी आणि विचारवंत गमावल्याबद्दल शोक व्यक्त करतो. कामगार मंत्री, रेल्वे मंत्री आणि समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आले याचा मला अभिमान आहे. राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे अतुलनीय योगदान देशाच्या इतिहासात कायमचे कोरले जाईल.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

n हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांचे ज्ञान आणि साधेपणा याबद्दल शब्दांत व्यक्त होणे अशक्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना.

अरविंद केजरीवाल, आप

n राजकारणात फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्यासारखा आदर मिळतो. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांच्या आठवणीत ते सदैव राहतील. आपल्या विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीरपणे वैयक्तिक हल्ल्यांनंतरही ते राष्ट्रसेवा करत राहिले. ते खऱ्या अर्थाने समतावादी, प्रबळ इच्छाशक्ती आणि अखेरपर्यंत धैर्यवान होते. मनमोहन सिंग हे राजकारणाच्या खडबडीत जगातील एक अनोखा प्रतिष्ठत आणि सभ्य माणूस होते.

प्रियांका गांधी, काँग्रेस, खासदार

n देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे.  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. देशाच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखनही त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून आता राजकारण...
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात
देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
घाटकोपरमध्ये भीषण अपघात, टेम्पोने 5 जणांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर चीन, रशिया आणि अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केला शोक