कास पठाराजवळील हॉटेलात रेव्ह पार्टीचा धुडगुस, हाणामारीत अनेक जखमी; 5 जणांवर गुन्हा
जागतिक वारसा स्थळ म्हणून कौतुकाचा विषय असलेल्या कास पुष्प पठाराजवळच्या एका हॉटेलवर रविवारी रात्री झालेली रेव्ह पार्टी, त्यावेळी नशेत तर्रर्र असणाऱ्या बेभान गुंडांनी धिंगाणा घातल्याचे चव्हाटय़ावर आले आहे. यावेळी झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या रेव्ह पार्टीला बारबालांच्या ‘छमछम’चीही साथ मिळाल्याने सातारकरांचे डोळे विस्फारले आहेत.
प्रतीक बापूराव दळवी (रा. जकातवाडी, ता. सातारा) याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रेयस श्रीधर भोसले (रा. सातारा), सोन्या जाधव, रोहन जाधव, अमर पवार (तिघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर, सातारा) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्याचे मित्र हे एकीव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर तीन ते चार नृत्यांगना नाचत होत्या. यावेळी एका दारुच्या नशेतील संशयिताने काही कारण नसताना फिर्यादीचा मित्र धीरज शेळके याच्या डोक्यात मद्याची बाटली मारली. त्यामुळे फिर्यादीने त्यास का मारले, असा जाब विचारला. यावरुन बाचाबाची होऊन चिडून संशयिताने हातातील दारुच्या बाटलीने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीतही मारहाण केली. त्याचबरोबर संशयितांच्या साथीदारांनीही फिर्यादी प्रतीक दळवीला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी आणि दारुच्या बाटल्यानी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या राड्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
चार दिवसांनी घटना चव्हाट्यावर
जागतिक वारसास्थळ म्हणून लौकिक असलेल्या कास पठार परिसराला गेल्या काही दिवसात बदनामीचे ग्रहण लागले आहे. अशातच या परिसरातील जावळी तालुक्यातील एकीव गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये रविवारी ही रेव्ह पार्टी झाली. यासाठी काही बारबालांना आणले होते. त्यांच्या ‘छमछम’च्या तालावर मद्यासह अंमली पदार्थांचे सेवन सुरू होते. नशेचा अंमल झाल्यावर जमलेल्या गुंडांनी फ्री-स्टाईल हाणामारी करत धिंगाणा घातल्याने या पार्टीचा पुरता बेरंग झाला. अर्थात त्यामुळेच ही रेव्ह पार्टी चव्हाट्यावर आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List