भाजपला एका वर्षात 2244 कोटींच्या देणग्या, ईडीची धाड पडलेल्या कंपन्यांचे धनही पोहचले; काँग्रेसच्या खात्यात 289 कोटी
ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून कारवाई करून विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात डांबणाऱया आणि ईडीची कारवाई सुरू असलेल्या फ्युचर गेमिंग अॅण्ड हॉटेल सर्व्हिसेससारख्या कंपन्यांकडून देणग्या स्वीकारणाऱया भाजपला 2023-24 मध्ये तब्बल 2 हजार 244 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणग्या 2022-23 च्या तुलनेत तब्बल तीन पटीने वाढल्याचे समोर आले आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला 288.9 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. 2022-23 च्या तुलनेत हा आकडाही वाढला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पक्षनिहाय देणग्यांची आकडेवारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार भाजपला प्रुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टच्या माध्यमातून 723.6 कोटी रुपयांची देणगी मिळाली तर काँग्रेसला याच ट्रस्टच्या माध्यमातून 156.4 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच 2023-24 मध्ये भाजपला मिळालेल्या एकूण देणग्यांमध्ये प्रुडेंटचा वाटा सुमारे एक तृतीयांश इतका आहे, तर काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांमध्ये प्रुडेंटचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. ही ट्रस्ट मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रा लिमिटेड, सीरम इन्स्टिटय़ूट, आर्सेलर मित्तर आणि भारती एअरटेल यांसारख्या देशातील प्रमुख कंपन्यांकडून निधी गोळा करते.
तपास यंत्रणांद्वारे कारवाई आणि वसुली
भाजपने ईडी, सीबीआय, आयटी या तपास यंत्रणांच्या आडून अनेक बड्या कंपन्यांवर कारवाई केली. या कारवाईच्या माध्यमातून या कंपन्यांकडून कोटय़वधींची वसुली करण्यात आल्याचे अनेकदा समोर आले आहे. भाजपने 2023-24 मध्ये फ्युचर गेमिंग अॅण्ड हॉटेल सर्विसेसकडून अलीकडेच 3 कोटी रुपयांचा निधी स्वीकारला. ही कंपनी सँटियागो मार्टिनची कंपनी असून मार्टिनला ‘लॉटरी किंग’ म्हणूनही ओळखले जाते. सध्या ही कंपनी मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचा सामना करत आहे. ईडीने मेघालयातील लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांविरुद्ध नोव्हेंबरमध्ये छापेमारी केली होती. मेघालयासह सहा राज्यांतील 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दरम्यान, ईडीच्या जप्ती, छापेमारी, बेकायदा अटक अशा मनमानी कारवायांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ईडीविरोधात फ्युचर गेमिंग कंपनी, अॅमेझन इंडियाचे कर्मचारी यांच्यासह अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत.
देणग्यांमध्ये 212 टक्क्यांनी वाढ
भाजपच्या 2023-24 मधील देणग्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 212 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने 742 कोटी आणि काँग्रेसने 146.8 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले होते. भाजपला मिळालेल्या देणग्यांपैकी 850 कोटी रुपये इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून मिळालेले आहेत. यात प्रुडंटकडून 723 कोटी, ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून 127 कोटी रुपये आणि एनझिगार्ंटग इलेक्टोरल ट्रस्टकडून 17.2 लाख मिळाले.
बीआरएसला 495.6 कोटी, डीएमकेला 60 कोटी, वायएसआर काँग्रेसला 121.5 कोटी, जेएमएमला 11.5 कोटी रुपये देणग्या मिळाल्या, तर आपला 11.1 कोटी रुपये मिळाले, सीपीएमला 7.6 कोटी, सपाला 46.7 लाखांच्या देणग्या मिळाल्या.
सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या देणग्यांमध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांचा समावेश नाही. निधीसाठी आता इलेक्ट्रोरल ट्रस्ट हाच मुख्य स्रोत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List