इतके मोठे सुपरस्टार असूनही अमिताभ बच्चन पत्नीकडूनच घेतात पैसे; ATM चा एकदाही केला नाही वापर
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से स्पर्धकांना सांगतात. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘केबीसी’चा सध्या सोळावा सिझन सुरू आहे. या शोमध्ये अनेकदा हॉटसीटवर बसलेले स्पर्धक बिग बींना त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल विविध प्रश्न विचारतात. त्यावर तेसुद्धा उत्स्फुर्तपणे उत्तरं देतात किंवा आपले अनुभव सांगतात. एका एपिसोडमध्ये स्पर्धकाने बिग बींना विचारलं, “जेव्हा मी ऑफिसमधून घरी जाते, तेव्हा आई मला कोथिंबीर किंवा इतर काही सामान घेऊन यायला सांगते. तुम्हाला सुद्धा जया मॅम बाजारातून असं काही आणायला सांगतात का?”
स्पर्धकाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ बच्चन मस्करीत म्हणतात, “अर्थात मला सांगतात. त्या म्हणतात, स्वत:ला सुखरुप घरी आणा (हसतात). जयाजींना गजरा खूप आवडतो. रस्त्यावर जेव्हा छोटी मुलं गजरा विकतात, तेव्हा मी ते विकत घेतो आणि जयाजींना देतो. कधी कधी माझ्या गाडीमध्ये मी ती फुलं ठेवतो, कारण त्यांचा सुगंध खूप छान येतो.” यानंतर स्पर्धक बिग बींना आणखी एक मजेशीर प्रश्न विचारते. “तुम्ही कधी बँक बॅलेन्स तपासायला किंवा कॅश काढायला एटीएममध्ये गेला आहात का”, असा सवाल बिग बींना विचारला जातो.
या प्रश्नाचं उत्तर देताना बिग बी सांगतात, “मी माझ्याजवळ कधीच कॅश ठेवत नाही आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. कारण मला तिथे गेल्यावर काय करायचं ते समजत नाही. मात्र जयाजींकडे कॅश नेहमीच असतं. मी त्यांच्याकडून पैसे मागून घेतो.” अमिताभ बच्चन यांचं हे उत्तर ऐकून हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकासह प्रेक्षकसुद्धा थक्क होतात. अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो खूप लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. सोनी टीव्ही या चॅनलवर आणि सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केबीसीचे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List