Garam Dharam Dhaba -ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना न्यायालयाचे समन्स, फसवणुकीची तक्रार दाखल
बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अन्य दोघांना गरम धरम ढाब्याशी संबंधित फसवणूक प्रकरणात समन्स बजावले. गरम धरम ढाब्याच्या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप दिल्लीच्या एका व्यावसायिकाने केला होता. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे.
दिल्ली न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी हे समन्स जारी केले आहेत. दिल्लीचे व्यापारी सुशील कुमार यांनी आपल्याला फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप केला होता. यासंदर्भातील पुढील कारवाई 20 फेब्रुवारी, 2025 रोजी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता धर्मेंद्र देओलसह इतर दोन जणांना भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 120B (गुन्हेगारी कट) कलम 34 (समान हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य) आणि कलम 506 नुसार गुन्हा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार सुशील कुमार यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2018 मध्ये सहआरोपींनी NH-24/NH-9 वर गरम धरम ढाब्याची फ्रँचायझी उघडण्याची ऑफर देऊन त्याच्याशी संपर्क साधला होता. तक्रारदार सुशील कुमार यांना कनॉट प्लेस, दिल्ली आणि मुरथल, हरियाणातील या रेस्टॉरंटच्या शाखा सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा नफा होत असल्याचे आमिष दाखवले.
तक्रारदाराला त्याच्या गुंतवणुकीवर सात टक्के नफा देण्याच्या बदल्यात 41 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारदाराला उत्तर प्रदेशमध्ये फ्रँचायझी स्थापन करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. तक्रारदार आणि सहआरोपी यांच्यात ई-मेलची देवाणघेवाण झाली असून यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List