खेलरत्न पुरस्कारावरून मनू भाकरच्या वडिलांचा संताप; म्हणाले नेमबाज ऐवजी क्रिकेटपटू बनवायला हवे होते
Paris Olympics 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत नेमबाज मनू भाकरने दोन कांस्य पदके पटकावण्याची किमया साधली होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून खेलरत्न पुरस्कारासाठी तिच्या नावाची घोषणा होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या खेलरत्न पुरस्कारांच्या यादीमध्ये मनू भाकरच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनूला नेमबाज ऐवजी क्रिकेटपटू बनवायला हवे होते, अशी संतप्त प्रतिक्रिया मनू भाकरच्या वडिलांनी दिली आहे.
मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी क्रिडा मंत्रालयावर आपला रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मला माझ्या मुलीला नेमबाजीमध्ये टाकून पश्चाताप झाला आहे. तिला मी क्रिकेटर बनवायला पाहिजे होते. तेव्हा तिला सर्व पुरस्कार आणि सन्मान मिळाले असते. तिने 106 वर्षांत प्रथमच एका ऑलिम्पिकमध्ये देशाला दोन पदके पटकावून दिली आहेत. तुम्ही माझ्या मुलीकडून देशासाठी आणखी काय अपेक्षा करत आहात? सराकरने तिच्या मेहनतीची दखल घेतली पाहिजे. तिला खेलरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी मागणी मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी केली आहे.
मनूने पुरस्कारासाठी अर्जच दिला नसल्याचे क्रिडा मंत्रालयाने म्हणणे आहे. मनू मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सर्व पुरस्कारांसाठी अर्ज देत आहेत. मी स्वत: त्याचा साक्षिदार आहे. या पुरस्करांमध्ये खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांचा समावेश आहे, असे रामकिशन भाकर यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कारांची शेवटची यादी जाहीर होणे बाकी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये क्रिडा मंत्रालयातील मंत्री मनसुख मांडविया अंतिम यादीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये मनू भाकरच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावत पदकांचे खाते उघडले होते. त्याच बरोबर ती नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी महिला ठरली. त्यानंतर तिनच दिवसांत तिने 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंगच्या साथीने कांस्य पदकाला गवसणी घातली होती. या पदकासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List