चंदनापुरी परिसरात तरुणाचा मृतदेह सापडला, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये शनिवारी (दि.21) रात्री शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचा घातपात झाला की बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला, याची माहिती अद्यापि समोर आली नाही. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रामनाथ सूर्यभान गुरकुले (वय 34, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. रामनाथ गुरुकुले हा तरुण आपली दुचाकी शनिवारी रात्री चंदनापुरी शिवारातील धगाडीबाबाजवळील उंबर विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी करून जवळच्या वनखात्याच्या जंगलात एका झाडाखाली तो झोपला होता. झोपलेल्या अवस्थेत त्याला काही ग्रामस्थांनी रात्री पाहिले असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी विनोद राहणे या तरुणाला त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. त्याने याची माहिती तातडीने चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे यांना दिली. त्यानंतर राहणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना या संदर्भात कळविल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास दुमणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे ही घटनास्थळी आले होते.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह ओढत नेल्याचे दिसून आले. तसेच मृत तरुणाचे मुंडके शरीरापासून वेगळे केल्याचे दिसत असल्याने त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. संगमनेर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बिबट्याच्या हल्ल्यात या परिसरात झालेला हा चौथा मृत्यू असल्याचे बोलले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List