तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीत भीषण आग, जीव वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ
तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये आज रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असल्याची शक्यता असून आपले प्राण वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू होती. कंपनीमध्ये शेकडोंच्या संख्येने कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आग लागताच मोठमोठे स्फोट झाले असून त्याच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये विराज प्रोफाइल लिमिटेड नावाची कंपनी असून त्या कंपनीत तीन शिफ्टमध्ये काम चालते. लोखंडी भंगार वितळवून त्यापासून तारा, वायर्स व अन्य वस्तू बनवल्या जातात. सेकंड शिफ्ट संपायची वेळ आली असताना रात्री सवादहाच्या सुमारास अचानक फर्निश ऑइलच्या भट्टीला आग लागली. काही क्षणातच ही आग पसरत गेली आणि कंपनीतील कामगार जीवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले.
विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये तीन शिफ्ट मिळून अंदाजे अडीच ते तीन हजार कामगार काम करतात असे समजले. दरम्यान ही आग आजूबाजूलाही पसरली असून आग विझवण्यासाठी तारापूर पालघर व विविध भागांतून आठ ते दहा पाण्याचे टँकर्स दाखल झाले आहेत. पोलीस अग्निशमन दलाचे जवान अॅम्ब्युलन्स व अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून आग विझवण्याचे रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापि समजलेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List