मुंबई डोळ्यांसमोरून ओरबाडून नेताहेत… मराठी माणसा जागा हो! उद्धव ठाकरे यांची हाक
‘एक है तो सेफ है’वाल्यांनी संपूर्ण मुंबई बरबटवून टाकलीय. बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यादेखत ओरबाडून नेली जातेय. अशा वेळेला आपण बघत बसणार का? उद्याची मुंबई आपली राहणार का, असा सवाल करतानाच, मराठी माणसा जागा हो, अशी कळकळीची साद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीजनांना घातली.
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी संतोष पिंगळे, सुनील भोस्तेकर, सतीश पवार आणि राहुल चोरगे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, गृहनिर्माण प्रकल्पांच्या नावाखाली मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याच्या हालचालींबाबत पुन्हा एकदा सावध केले. आता झोपून चालणार नाही, कारण हा मुंबईच्या, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. जिंकल्यानंतर सर्व येतात, हरल्यानंतर कुणी येत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
चोर, दरोडेखोरांची सत्ता उलथवून टाका
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी सर्व महाराष्ट्र म्हणत होता शिवसेना आणि महाविकास आघाडीच विजयी होणार. सर्व्हेमध्येही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता?… यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असा आवाज दिला. मग दांडी कशी उडाली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच एकच हशा पिकला आणि मशीन घोटाळा…मशीन घोटाळा…असे उपस्थित गर्दीने उत्तर दिले. त्यावर, ही चोर, दरोडेखोरांची सत्ता आहे, ती सत्ता आपल्याला उलथवून टाकायची आहे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेना एकच आहे, फक्त निशाणी बदललीय
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसेवरही निशाणा साधला. पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते ती काहीच नाही. त्यामुळे कार्यकर्ते मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला मग काहीच अर्थ राहत नाही, असे ते म्हणाले. मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव दुसऱ्या कुणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. शिवसेना एकच आहे फक्त निशाणी बदललीय, असे ते पुढे म्हणाले. योग्य वेळेला तुम्ही मशाल आणि भगवा हाती घेतला आहे. आता जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांद्या लावून लढतील, असेही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या विजयात काहीतरी घपला आहे
मनसेतून शिवसेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. निकाल लागला तरी तुम्ही शिवसेनेत येत आहात आणि जल्लोषात येत आहात, पण जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोषच नाही. याचा अर्थ त्यांचा त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही. म्हणजेच त्या विजयात काहीतरी घपला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केला. उपस्थितांनी यावर ईव्हीएम मशीन घोटाळा आहे असे म्हणताच, मशीन घोटाळा आहे आणि बरेच घोटाळे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List