“बापरे! फायनली सांगतोय मी…” म्हणत अक्षय केळकरने दाखवला गर्लफ्रेंडचा चेहरा; कोण आहे ती?
‘बिग बॉस मराठी 4’चं विजेतेपद पटकावणारा अभिनेता अक्षय केळकर सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रविवारी अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘एकत्रितपणे घालवलेली 10 वर्षे आणि आता अखेर ती वेळ आली आहे’, असं कॅप्शन देत अक्षयने हा खास व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अक्षयसोबत एक तरुणी दिसून येत होती, मात्र तिचा चेहरा त्याने दाखवला नव्हता. कॅप्शनमध्ये ‘#रमा’ असं लिहिल्याने अक्षयच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे, यावरून नेटकऱ्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली. या पोस्टच्या काही तासांनंतर अखेर अक्षयने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. गर्लफ्रेंड रमासोबतचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘तर ही माझी रमा.. उद्या आम्हाला दहा वर्षे पूर्ण होतायत. म्हटलं एक दिवस आधीच सांगावं.. म्हणून.. बापरे, फायनली सांगतोय मी. पण काहीही झालं तरी आय लव्ह यू.. मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही’, असं कॅप्शन देत त्याने रमासोबतचा रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अक्षयच्या आयुष्यातील या रमाचं खरं नाव साधना काकटकर आहे. ती गायिका आणि गीतकार आहे. अक्षय आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ या गाण्यांसाठी साधनाने काम केलंय. तिने लिहिलेली गाणी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. साधनाने सावनी रविंद्र, मंगेश बोरगावकर अशा लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय.
साधना आणि अक्षय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जातंय. अक्षयने ही पोस्ट लिहिताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अक्षयच्या या पोस्टवर साधनानेही कमेंट करत लिहिलंय ‘संपला फ्रीडम (स्वातंत्र्य).. आता कसं वाटतंय?’ त्यावर अक्षयनेही तिला मजेशीर उत्तर दिलं आहे. ‘मी फ्रीडम फायटर आहे, तुला माहितीये’, असं त्याने लिहिलंय. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरल्यानंतर अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात भाग घेतला. यामध्ये त्याची विनोदी शैलीदेखील प्रेक्षकांना पहायला मिळाली. याशिवाय कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List