विमानतळावर सापडले ड्रोन; मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथील घटना
शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असली तरी मुंबई विमानतळावरील ओल्ड एअर इंडियाच्या हँगरजवळील इको 8 टॅक्सी वे येथे ड्रोन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या शपथविधीच्या दिवशीच विमानतळावर ड्रोन आढळून आल्याने सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ते ड्रोन कुठून आले, ते कोणाच्या मालकीचे होते हे स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
गेल्या आठवड्यात आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री आदी उपस्थित होते. व्हीव्हीआयपी येणार असल्याने आगमन-निर्गमन दौऱ्यात ठीकठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या होत्या. त्या सकाळी साडेनऊच्या सुमारास मियाल कार्यालय, डोमेस्टिक विमानतळ टर्मिनल 1 च्या ओल्ड एअर इंडियाच्या हँगरजवळ असलेल्या इको 8 टॅक्सी वे येथे पोलिसांना ड्रोन मिळून आले.
याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीजवळून ड्रोन उडवणाऱयाचा शोध घेतला. मात्र तेथे कोणीच मिळून आले नाही. विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी ड्रोन उडवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ते ड्रोन कोणाच्या मालकीचे आहे, बंदी असतानाही ड्रोन तेथे कसे आले याबाबत तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List