ज्याच्या हातात EVM त्याची लोकशाही असं समिकरण झालंय! संजय राऊत यांची टीका
आपल्या देशात ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असे समिकरण झालेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठका होत असून यासाठी पुण्यात पोहोचले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.
विधानसभेच्या निकालावर चिंतन, मंथन करण्यापेक्षा पुढे जायला हवे. आम्ही वर्षानुवर्ष निवडणुका लढतोय. पण गेल्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत तसे 70 वर्षात पाहिले नाही. असे असतानाही महाराष्ट्र आणि देशात आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झाले. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांनाही ते आम्हाला मिळाले की नाही अशी भावना आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता येईल अशा प्रकारचे वातावरण होते. तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता, असेही संजय राऊत म्हणाले. नवीन सरकार आल्यापासून महाराष्ट्रात जे चित्र आहे ते आपण पाहतोय आहे. सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ तयार होत नव्हते. मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेपाटप जाहीर होत नाही. पाशवी बहुमत असतानाही तुम्हाला कोण अडवतेय? महायुतीकडे 225 आमदारांचे बहुमत आहे. यात 140 च्या आसपास भाजपचे आमदार असून तरीही खातेवाटप होत नाही. हे राज्य चालणार कसे? राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. ठिकठिकाणी खून, हत्या, दरेडो, बलात्कार होत आहेत आणि हे 14 कोटी जनतेचे आभार मानत फिरत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका हा कळीचा मुद्दा असतो. येथे शिवसेना महत्त्वाचा फॅक्टर असून एवढ्या कठीण परिस्थितीतही आम्ही 10 जागा जिंकल्या, तर 4 जागा फार कमी मतांनी हरल्या. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवावीच लागेल. अन्यथा मुंबई वेगळी होईल. कार्यकर्त्यांचा स्वबळाचा रेटा असतो. मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकड आहे. स्वबळाच्या मागणीबाबत आम्ही चर्चा करू, असेही राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जिंकल्या असत्या. पण तसे होऊ शकले नाही. मुंबईमध्ये आम्हाला लढावे लागेल. प्रमुख नेत्यांची, कार्यकर्त्यांची स्वबळाची मानसिकता आहे. पण आम्ही चर्चा करू. भाजपसोबत असतानाही आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलो आहोत. मुंबईचे महत्त्व महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर फार वेगळे आहे. तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर मुंबईचा तुकडा पाडतील, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भाजपसोबत युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत इच्छुकांची संख्या जास्त असते. लोकसभेला कमी असते, विधानसभेला वाढते. लोकसभा निवडणुका झाल्या त्यात फार खेचातानी नव्हती, ती विधानसभेला दिसली. निवडणुकीत दोन-तीन पक्षांची आघाडी असते तेव्हा असे होते. पण आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असे समिकरण झालेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List