Mumbai Boat Capsized: बोट अपघातात आठ जण बेपत्ता, बचावकार्यासाठी नौदलाच्या १४ बोटी अन् ४ हेलिकॉप्टर
Mumbai Boat Capsized: मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोटीमध्ये ८० प्रवासी होते. त्यातील ७७ जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच आठ जण बेपत्ता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
नौदलाकडून धडकेचा इन्कार
दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी पोहचले. नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे बोट पूर्णपणे पाण्यात बुडली. अपघात कसा झाला, ते चौकशीतून समोर येईल. परंतु आधी बोटीमधील प्रवाशांना वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान नौदलाकडून आमच्या बोटीने धडक दिल्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे.
रुग्णालयात दाखल काही जणांची प्रकृती गंभीर
दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशननंतर 56 जणांना जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच 9 प्रवाशांना नौदलाच्या डॉकयार्डमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील आठ जणांची प्रकृती स्थिर आहे. परंतु एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नऊ जणांना भरती केले आहे. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. बोटीत असणाऱ्या पाच क्रू मेंबर सुरक्षित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List