गृहमंत्री अमित शहांच्या विधानातून संविधान निर्मात्याबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला – नाना पटोले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List