औषधोपचार न घेणाऱ्या कैद्यांचे नाव न्यायालयाला सांगा, हायकोर्टात सादर झाले 11 डिसेंबरचे कारागृह विभागाचे परिपत्रक
आजारी असलेले कैदी वेळेवर औषधोपचार घेत नसतील किंवा टाळाटाळ करत असतील तर त्याचा अहवाल संबंधित न्यायालयात सादर करा, अशा कैद्यांच्या नातलगांना याची माहिती द्या, असे सक्त आदेश कारागृह व सुधारसेवा विभाग यांनी कारागृह प्रशासनाला जारी केले आहेत.
गेल्या आठवड्यात 11 डिसेंबरला तसे परिपत्रक जारी करण्यात आले. कैद्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत या परिपत्रकात मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष करून कारागृह अधीक्षकांसाठी या सूचना आहेत. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर हे परिपत्रक सादर करण्यात आले. त्यावर न्यायालय म्हणाले, गंभीर आजारी असलेल्या कैद्यांना वैद्यकीय जामीन द्यावा. त्यांना नजरकैदेत ठेवावे, अशा केंद्राच्या सूचना आहेत. त्यानुसार कारागृह प्रशासनाने गंभीर आजारी व मनोरुग्ण कैद्यांचा शोध घेऊन या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.
खंडपीठाने घेतला कारागृहाचा आढावा
न्या. मोहिते-डेरे व न्या. चव्हाण यांच्या खंडपीठाने रविवारी येरवडा कारागृहाला भेट दिली. तेथील महिला व पुरुष कैद्यांची विचारपूस केली व सोमवारी भेलकेच्या याचिकेवर सुनावणी घेतली. येरवडा कारागृहात रुग्णालय व रक्ताची चाचणी करणारी लॅब उभारण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून कैद्यांना तातडीने उपचार मिळतील, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी खंडपीठाला दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List