तू मला आधी का नाही भेटलास?; हृता दुर्गुळेचा या मराठी अभिनेत्याला सवाल
अभिनेत्री हृता दुर्गुळे विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिने ‘अनन्या’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मग ती ‘टाइमपास 3’ आणि ‘कन्नी’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिका, चित्रपट आणि रंगभूमी अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये हृता आपली विशेष छाप पाडतेय. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या तिच्या नाटकाला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता हृता पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला फोटो आणि त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेला मजकूर. तू मला आधी का नाही भेटलास.. असं लिहित हृताने अभिनेता ललित प्रभाकरसोबतचा हा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे.
हृताने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ललितने तिला उचलून घेतल्याचं दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने दोघांमधील संवाद लिहिलाय. ‘ती – तू मला आधी का नाही भेटलास? तो – तुझी वाट बघण्यात वेळ गेला. वेड लागणार नसेल तर प्रेम करण्यात काही गंमत नाही. घेऊन येतोय त्याची आणि तिची क्रेझी लव्हस्टोरी,’ असं कॅप्शन तिने लिहिलंय. ‘जसं तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी इच्छा व्यक्त केली, तसं आम्ही दोघांनीही एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण केली. लवकरच थिएटरमध्ये भेटू’, असंही तिने पुढे म्हटलंय. हृता आणि ललितच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे.
चाहत्यांसोबतच अमृता खानविलकर, सायली संजीव, शरयू दाते, हेमंत ढोमे, ऋचा इनामदार यांसारख्या सेलिब्रिटींनीही या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. हृताचा पती प्रतीक शाह यानेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये काही इमोजी पोस्ट केले आहेत. फोटो आणि कॅप्शनवरून हा चित्रपट म्हणजे लव्ह स्टोरी असेल, हे स्पष्ट होतंय. हृता आणि ललित या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच हृताने नवीन हेअरकट केल्याचा फोटो पोस्ट केला होता. ललितसोबतच्या या चित्रपटासाठीच तिने हा नवा लूक केला असल्याचं आता स्पष्ट झालंय.
हृताने मालिका, नाटक आणि चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही काम केलंय. ‘कमांडर करण सक्सेना’ या सीरिजमध्ये तिने भूमिका साकारली होती. या सीरिजमधील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List