स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
संपूर्ण जगभरात स्ट्रोकमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा कायमचे अपंगत्व सहन करावे लागणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. स्ट्रोकचा धोका ज्यांना सर्वात जास्त आहे अशांसाठी, स्ट्रोकला कारणीभूत ठरणारे आजार किंवा आनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. यामुळे स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल. स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी डॉ प्रदीप महिंद्रकर यांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या आहेत.
या व्यक्तींना असतो स्ट्रोकचा सर्वाधिक धोका
हायपरटेन्शन : उच्च रक्तदाब हा स्ट्रोकला कारणीभूत असलेला सर्वात मोठा धोका आहे. रक्तदाब सतत वाढत राहिल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे इशेमिक आणि हेमोरेजिक स्ट्रोक या दोन्हींचा धोका वाढतो.
मधुमेह : मधुमेही व्यक्तींच्या शरीरात शर्करेचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो.
हायपरलिपिडेमिया : कोलेस्टेरॉल वाढल्याने अथेरोस्क्लेरॉटिक प्लाक तयार होतो आणि इशेमिक स्ट्रोकचा धोका वाढतो.
ऍट्रियल फिब्रिलेशन (एफिब): एफिबमुळे स्ट्रोकचा धोका पाच पटींनी वाढतो. हृदयाचे ठोके अनियमित असले तर हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, ज्या मेंदूपर्यंत जाऊ शकतात.
धूम्रपान : धुम्रपानामुळे अथेरोस्क्लेरोसिस आणि थ्रॉम्बोसिस हे दोन्ही होतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो.
स्थूलपणा आणि बैठी जीवनशैली : या दोन्हींमुळे हायपरटेन्शन, मधुमेह आणि हायपरलिपिडेमिया यांचा धोका वाढतो.
जेनेटिक आणि कौटुंबिक इतिहास : कुटुंबात आधी, इतर कोणाला स्ट्रोक आला असेल किंवा कार्डिओवस्क्युलर आजार असतील तर पुढील पिढ्यांना देखील स्ट्रोकचा धोका वाढतो. खासकरून जर हायपरलिपिडेमिया किंवा एफिबसारख्या स्थितींची अनुवंशिकता असेल तर स्ट्रोकचा धोका जात असतो.
किडनीचा जुनाट आजार (सीकेडी) : सीकेडी असलेल्या व्यक्तींना स्ट्रोकचा धोका जास्त असतो कारण त्यांना हायपरटेन्शन, मधुमेह आणि वस्क्युलर नुकसान अशा सहव्याधी असतात.
प्रतिबंधात्मक उपाय
अ. हायपरटेन्शनवर नियंत्रण
रक्तदाब नियंत्रणात ठेवा : सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्यांना धोका जास्त आहे अशा व्यक्तींनी सिस्टोलिक रक्तदाब 140 एमएमएचजीच्या खाली ठेवावे. ज्यांना किडनीचा जुना आजार किंवा मधुमेह आहे अशांचा रक्तदाब 130/80 एमएमएचजीच्या खाली असला पाहिजे.
औषधे : एसीई इनहिबिटर्स, एआरबी (अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स), कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि डायरेटीक्स यांचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो.
ब. मधुमेह आणि हायपरलिपिडेमिया यांच्यावरील उपचार
ग्लायसेमिक नियंत्रण : रक्तातील शर्करेवर (ए1सी 7%च्या खाली) काटेकोर नियंत्रण ठेवल्यास मधुमेही रुग्णांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी होतो.
लिपिड कमी करण्याची थेरपी : हायपरलिपिडेमिया असलेल्या व्यक्तींसाठी स्टॅटिन्सचा सल्ला दिला जातो, खासकरून ज्यांना कार्डिओवस्क्युलर आजार आधीपासून आहेत. त्यांना एलडीएल कोलेस्टेरॉल स्तर आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हे आवश्यक असते.
क. अँटीथ्रोम्बोटिक थेरपी
अँटीप्लेटलेट थेरपी : धोका जास्त असलेल्या व्यक्तींना, खासकरून ज्यांना आधी इशेमिक स्ट्रोक येऊन गेला आहे अशांना अॅस्पिरिनचा लहान डोस घेण्याचा सल्ला दिला जातो.
एफिबमध्ये अँटीकोग्युलेशन : वॉरफेरीनसारखे अँटीकोग्युलेशन किंवा थेट तोंडावाटे घ्यावयाचे अँटीकोग्युलंट्स हे एफिबच्या रुग्णांमध्ये स्ट्रोकला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असतात, खासकरून ज्यांना हायपरटेन्शन किंवा मधुमेहाचा अतिरिक्त धोका असतो त्या रुग्णांनी हे नक्की ध्यानात ठेवावे.
ड. अॅट्रियल फिब्रिलेशनवरील उपचार
रेट आणि रिदम नियंत्रण : एफिबवरील आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठीच्या औषधांमध्ये बीटा-ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि अँटी-अऱ्हिथमिक्स यांचा समावेश असतो. हृदयाचा सामान्य रिदम पुन्हा यावा यासाठी काही निवडक रुग्णांमध्ये अब्लेशन प्रक्रिया करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
ई. स्ट्रोक येऊ नये यासाठी जीवनशैलीमध्ये हे बदल अवश्य करा. वैद्यकीय उपायांच्या बरोबरीने जीवनशैलीमध्ये अनुकूल बदल करून स्ट्रोकचा धोका कमी करता येतो.
1. धूम्रपान करणे कायमचे सोडून दिल्यास स्ट्रोकचा आणि इतर कार्डिओवस्क्युलर आजारांचा धोका खूप प्रमाणात कमी होतो. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि आचरणासंदर्भात मार्गदर्शन व सल्ला घेतल्यास धूम्रपान सोडून देण्यात मदत होते.
2. दर आठवड्याला कमीत कमी 150 मिनिटे तरी मध्यम ते उच्च तीव्रतेचे व्यायाम करून कार्डिओवस्क्युलर आरोग्य सुधारता येते आणि वजन कमी होण्यात देखील मदत होते. स्थूल व्यक्तींनी वजन कमी केल्यास रक्तदाब, ग्लुकोज मेटॅबोलिजम आणि कोलेस्टेरॉल स्तर यामध्ये सुधारणा होते आणि यांचा एकत्रित परिणाम म्हणून स्ट्रोकचा धोका कमी होतो.
3. आहारातील बदल : या डाएटमध्ये सोडियमचे प्रमाण कमी करण्यावर, पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यावर, रोजच्या आहारात फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि लीन प्रोटीन यांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. यामुळे रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो असे आढळून आले आहे.
फ. विशेष व्यक्तींसाठी विशेष धोरणे:
1. वयस्कर व्यक्तींसाठी रक्तदाब आणि अँटीकोग्युलेशन धोरणे तयार केली जावीत ज्यामुळे स्ट्रोकला प्रतिबंध घालता येईल, तसेच ब्लीडिंगचा धोका कमी होऊ शकतो.
2. सीकेडी रुग्णांना हायपरटेन्शन आणि अँटीकोग्युलेशन यासाठी व्यक्तिगत उपचार द्यावे लागतात, कारण त्यांच्या बाबतीत ब्लीडिंगचा धोका जास्त असतो, तसेच किडनीबरोबरीनेच कार्डिओवस्क्युलर संरक्षण यांचे संतुलन साधणे गरजेचे असते.
ग. सार्वजनिक आरोग्य आणि धोरणे
1. ज्यांना स्ट्रोकचा धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये हायपरटेन्शन, मधुमेह आणि एफिब लवकरात लवकर लक्षात यावे यासाठी तयार करण्यात आलेले कार्यक्रम स्ट्रोक येण्याच्या आधी निवारक उपाय सुरु करण्यास मदत करू शकतात.
2. सार्वजनिक आरोग्य अभियानामध्ये स्ट्रोकबाबत माहिती पुरवली गेली पाहिजे तसेच ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले गेले पाहिजे. ज्यांना धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींना आरोग्य देखभाल सेवा सहज आणि परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामध्ये औषधे, जीवनशैलीबाबत सल्ला यांचा समावेश होतो. आयुष्यात दीर्घकाळपर्यंत स्ट्रोक टाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List