बांगलादेशातील अत्याचाराविरोधात हिंदू समाज आक्रमक, पश्चिम महाराष्ट्रात संताप; ठिकठिकाणी आंदोलने
बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता उलथवून नवीन सरकार आले, तरी गेल्या काही महिन्यांपासून हिंदू मंदिरे, बुद्ध विहार आणि नागरिकांवर हल्ले वाढतच आहेत. सातत्याने हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळत असून, हिंदू समाज आक्रमक झाला आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करीत संताप व्यक्त करण्यात आला.
कोल्हापुरात ठिय्या आंदोलन
सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी इस्कॉन टेम्पलच्या वतीने भजन करीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात सकल हिंदू समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सांगलीत हिंदू न्याय यात्रा
सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगलीत तहसीलदार कार्यालयावर ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रा’ काढत निदर्शने केली. यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ सहभागी झाले होते. यावेळी गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान मत्स्यअवतार दास, इस्कॉन उपाध्यक्ष शुभानंद दास, राधानील माधवदास यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. तसेच तासगाव, ईश्वरपूर, विटा, सांगली शहर, जत, कवठेमहांकाळ येथेही आंदोलन करण्यात आले.
हुपरी येथे निदर्शने
हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने हुपरी (ता. हातकणंगले) येथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजित सुतार, शिवाजी शिंगारे, शिवाजी मोटे, नितीन काकडे, सोहम हुपरे, निळकंठ माने आदी उपस्थित होते.
अहिल्यानगरमध्ये दुचाकी रॅली
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री विशाल गणेश मंदिराचे संगमनाथ महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात
आल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कोपरगावात निषेध मोर्चा
तालुक्यातील सकल हिंदू संघटनेच्या वतीने सकाळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश सावंत व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी योगेश महाराज फापाळे-करंजीकर, कैवल्य महाराज, इस्कॉनचे सोमवंशी दास, पद्म गोविंद दास, साक्षी गोपालदास यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
राहुरीत मूक मोर्चा
बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज राहुरी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, तान्हाजी धसाळ, सुरेश बानकर, रावसाहेब चाचा तनपुरे, राजूभाऊ शेटे, शिवाजी सोनवणे, हर्ष तनपुरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांच्या हस्ते तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.
नेवाशात मूक मोर्चा नेवासा
सकल हिंदू समाज नेवासा तालुका यांच्या वतीने खोलेश्वर गणपती चौकापासून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी स्वामी प्रकाशानंद महाराज गिरी, सुनीलगिरी महाराज, रमेशानंद महाराज, योगी ऋषिनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, बाळू महाराज कानडे, नंदकिशोर महाराज खरात, सचिन महाराज पवार आदी संत-महंत उपस्थित होते.
■ पाथर्डी, जामखेड, संगमनेर, कर्जत या शहरांतही सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला.
पंढरीत मूक मोर्चा
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर शहरातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत निषेध केला. यावेळी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List