नियतीने जोडीदार हिरावला अन् समाजाने सौभाग्याचा अलंकार; टेम्पो ट्रॅव्हल्सखाली चिरडलेल्या महिलेचे सव्वालाखाचे गंठण चोरीला
चंपाषष्ठीनिमित्त खेड तालुक्यातील खरपुडी येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी ती पतीसमवेत दुचाकीवरून गेली. तेथून घरी परतत असताना भरधाव टेम्पोच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाला. एकीकडे नियतीने असा घाला घातला असताना, दुसरीकडे मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या माणुसकी हरविलेल्या समाजाचाही त्यांना कटू अनुभव आला. रुग्णालयात मृतदेह नेताना सौभाग्याचा अलंकार असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सव्वालाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण कोणीतरी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 7 डिसेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर वाकी येथे ही घटना घडली.
मंगल वसंतराव गाडे (वय – 54, रा. येलवाडी, ता. खेड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती वसंतराव भिकाजी गाडे (वय 69) यांनी फिर्याद दिली आहे. वसंतराव हे नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी (दि. 7) चंपाषष्ठीनिमित्त वसंतराव आणि त्यांची पत्नी मंगल हे दुचाकीवरून श्री क्षेत्र खरपुडी येथे खंडोबारायाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते पुन्हा घरी परतत होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाकी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सने घडक दिली. या धडकेत मंगल आणि वसंतराव दोघेही रस्त्यावर पडले. वसंतराव यांना मुक्का मार लागला. तर, मंगल यांच्या डोक्यावरून टेम्पो ट्रॅव्हल्सचे पाठीमागील चाक गेल्याने मंगल गंभीर जखमी झाल्या. काही क्षणात आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा मृतदेह डोळ्यासमोर पाहून वसंतराव यांना जबर मानसिक धक्का बसला.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली. रुग्णवाहिका बोलावून मंगल यांना आस्था रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनासाठी दुपारी दोन वाजता मंगल यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यादरम्यान, मंगल यांच्या गळयात पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. मात्र, सव्वादोनच्या सुमारास मंगल यांचे नातेवाईक रुग्णालयात आले असता, मंगल यांच्या गळ्यातील 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे गंठण गायब झाल्याचे निदर्शनास आले. कोणीतरी मंगल यांचे गंठण लंपास केल्याचे समोर आले. त्यावरून चाकण पोलीस ठाण्यात गंठण चोरीला गेल्याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
गाडे दाम्पत्याचा अपघात झाला, त्यावेळी मंगल यांच्या गळ्यात सोन्याचे गंठण होते. मात्र, शवविच्छेदनासाठी मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर मंगल यांच्या गळ्यात गंठण नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. गंठण चोरीला गेले की गहाळ झाले, या दोन्ही बाजूने तपास सुरू आहे.
आर. बी. मोर, फौजदार चाकण
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List