शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे निधन
शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पश्चात जिल्हाप्रमुखपदाची यशस्वी धुरा सांभाळणाऱया मोरे यांच्या निधनामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जवाहर बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहणारा कडवट शिवसैनिक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचे 2001 मध्ये निधन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी रघुनाथ मोरे यांच्याकडे सोपवली होती. मोरे यांनी ठाणे जिह्यात विविध आंदोलने केली. स्पष्ट वक्तेपणा व तातडीने निर्णय घेणे हे त्यांचे प्रमुख गुण होते. दिघे यांच्या पश्चात त्यांनी शिवसेनेची ताकद जिह्यात वाढवली. 2002 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते. या यशामध्ये मोरे यांचा मोठा वाटा होता.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी ‘सरोवर दर्शन’ या निवासस्थानी जाऊन मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. जवाहर बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख प्रदीप शेंडगे, प्रवक्ते अनिश गाढवे, माजी नगरसेवक मंदार विचारे, प्रकाश पायरे, विभागप्रमुख जिवाजी कदम, राजू मोरे, परिवहनचे माजी सदस्य राजेंद्र महाडिक, उपविभागप्रमुख मनोज गुप्ता, लहू सावंत यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारीही उपस्थित होते.
ठाणे जिह्यात सर्वत्र फिरत असताना रघुनाथ मोरे यांना काही वर्षांपूर्वी अपघात झाला व त्यात ते गंभीर जखमी झाले. आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र शिवसेनेमध्ये गद्दारी झाल्यानंतरही मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यांचे चिंरजीव मिलिंद मोरे ठाण्यात उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. 28 जुलै रोजी विरार येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर रघुनाथ मोरे हे खचले होते. आज अखेर दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, भाऊ, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List