दिल्ली डायरी – बिर्ला-धनखड यांच्यातील बदल
>> नीलेश कुलकर्णी
संसदेत सध्या ‘आक्रीत’ घटना घडत आहे. दोन्ही सभागृहांचे सभापती चक्क संतुलित भूमिका घेत आहेत. वेळप्रसंगी सरकारला खडेबोल सुनावत आहेत. शेतकऱयांच्या आंदोलनावरून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मोदी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पेंद्रीय मंत्र्यांनाच कानपिचक्या दिल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला चांगलाच घाम फुटला. धनखड व बिर्ला हे अचानक असे कसे बदलले? याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आहेत. संसदीय प्रणालीत सभापतींना ‘कस्टोडियन’ म्हटले जाते.
सभापती हे निष्पक्ष असावेत, असा संसदीय संकेत असतो. मात्र 2014 नंतर देशात व्यक्तीपूजा इतकी मोठय़ा प्रमाणावर वाढली की, सभापतींसारख्या सर्वोच्च स्थानावरचे लोक दुय्यम भासायला लागले किंवा तशी जाणीवपूर्वक व्यवस्थाच केली गेली. दहा वर्षांनंतर का होईना सभापतींनी आता सरकारी पक्षाला धारेवर धरायला सुरुवात केल्याने ‘कुछ बदले बदले से लग रहै है जनाब’ असे म्हणायची वेळ आली आहे. शेतकऱयांच्या आंदोलनावरून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मोदी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पेंद्रीय मंत्र्यांनाच कानपिचक्या दिल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला चांगलाच घाम फुटला. धनखड व बिर्ला हे अचानक असे कसे बदलले? धनखड यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याचा विरोधी पक्षांचा मध्यंतरी मानस होता. धनखड यांच्या सभागृह चालविण्याच्या पद्धतीबद्दल अनेकांच्या तक्रारी होत्या. तसेच धनखड यांनी राज्यसभेत केलेल्या मेगा भरतीची चर्चा ऐकायला मिळते. ही सरकारची बदनामी ठरेल हे लक्षात आल्यानंतर त्या मनमानीला चाप लावला जात आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या धनखडांना शेतकऱयांची आठवण होत आहे. राज्यसभेची पुढची टर्म मिळणार नाही, हे लक्षात येताच धनखडांनी ‘गियर’ टाकल्याचे मानले जात आहे. लोकसभेत बिर्ला यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याएवढे संख्याबळ विरोधकांकडे नक्कीच आहे. त्यामुळे परिस्थिती नक्कीच पहिल्यासारखी राहिलेली नाही, हे लक्षात आल्यामुळे बिर्ला यांचे सूर ‘मवाळ’ झाले आहेत. एरवी विरोधी पक्षाचा खासदार बोलायला उभा राहिला की, त्यांचा माईक बंद करून त्यांच्यावरचा लोकसभा टीव्हीचा पॅमेरा बंद करणारी ‘यंत्रणा’ होती. आता ती यंत्रणा विरोधी खासदारांना पुरेसा स्पेस देत आहे. कारणे काहीही असोत दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांना आपला आवाज उठविण्याची संधी मिळत आहे. सभापतीही ती देत आहेत. जे दहा वर्षांत घडले नाही ते आता घडले, हेही नसे थोडके!
कोण होतास तू…!
अकाली दलाने त्यांना ‘तनखैया’ घोषित करून गुरुद्वारामध्ये सेवा करण्याची शिक्षा सुनावल्यानंतर ही सेवा करत असतानाच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुदैवाने ते त्यातून बचावले. संकटे आली की, ती एकटीदुकटी येत नाहीत घोळक्याने येतात असे म्हणतात. त्याचीच प्रचीती सध्या सुखबीर घेत आहेत. सुखबीर यांचे वडील सरदार प्रकाशसिंग बादल हे पंजाबचे लोकप्रिय नेते. मात्र सुखबीर हे कायमच वादविवादात अडकले. पंजाबला ‘उडता पंजाब नशेबाज पंजाब’ करण्यात सुखबीर व त्यांच्या पत्नी हरसिमरत यांचे व्यावसायिक संबंध कारणीभूत असल्याची चर्चा नेहमीच होते. प्रकाशसिंग बादलांच्या निधनानंतर सुखबीर यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. अकाल तख्ताने त्यांना निवडणुकीपासून दूर राहण्याचा आदेश दिला. धर्मविरोधी व न्यायविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत गुरुद्वारामध्ये ‘सेवा’ करण्याची शिक्षा फर्मावली. ही शिक्षा पूर्ण करण्यासाठी सुखबीर हे अमृतसरमधील श्री हरमंदिर साहिब गुरुद्वारामध्ये एका व्हीलचेअरवर बसून पोहोचले. एरवी एकदम मजबूत असणारे सुखबीर यांचा तो ‘अवतार’ बघून अनेक जण हळहळले. गुरुद्वारामध्ये ते सेवा करत असतानाच एका माथेफिरूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कसेबसे वाचले. अकाली दलाचे नेतृत्वही आता त्यांच्याकडून काढल्यात जमा आहे. त्यामुळेच ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ असा प्रश्न सुखबीर बादल यांची सध्याची अवस्था पाहून पडतो.
अन्नामलाई स्वदेशात…
अन्नामलाई हे नाव कदाचित तुमच्या स्मरणात असेल. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकी वेळी भाजपच्या अंधभक्तांनी पूर्वाश्रमीचे आयपीएस अधिकारी व तामीळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना ‘क्रांतिवीर’ बनवले होते. अन्नामलाई हे द्रमुकची विचारधारा व पक्ष तामीळनाडूतून समूळ नष्ट करतील आणि तिकडेही हिंदुत्वाचे ‘नवेयुग’ सुरू करतील अशा भाकड कथा रंगवल्या होत्या. काही महाभागांनी तर ते देशाचे पुढचे पंतप्रधान असतील व हिंदू राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणतील अशी भाकिते रचली होती. प्रत्यक्षात लोकसभेत तामीळनाडूत भाजपची पुरती दाणादाण उडाली. अन्नामलाईंच्या कार्यशैलीबद्दल दिल्लीपर्यंत तक्रारी गेल्या. आपली आता उचलबांगडी होईल याचा अंदाज ‘सरकारी सेवेत’ राहिल्यामुळे अन्नामलाईंना अगदी सुरुवातीलाच आला. त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘चेवनिंग गुरुकुल फेलोशिप फॉर लीडरशीप’साठी आपली निवड झाल्याचे सांगून चार महिन्यांची सुट्टी द्यावी, असा बहाणा दिल्लीत पक्षनेतृत्वापुढे केला. पक्षनेतृत्वाला हे सगळे गौडबंगाल माहिती होते. मात्र वाद अधिक वाढायला नको म्हणून या फेलोशिपला जाण्यासाठी त्यांना मूक संमती देण्यात आली. चार महिन्यांनंतर विदेशी नेतागिरीचे गुण शिकून आता हे अन्नामलाई महाशय मायदेशी परतले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर तामीळनाडूच्या दारुण पराभवावर अजून तरी चर्चा झालेली नाही. आता त्यासाठी अन्नामलाई यांना लवकरच दिल्लीत पाचारण केले जाईल. आता त्या वेळी त्यांच्या विदेशी नेतागिरीचे काwशल्य पणाला लागेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List