सामना अग्रलेख: भोंदू भूषण!

सामना अग्रलेख: भोंदू भूषण!

भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे. हेच भोंदू लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशांतून मिळवलेली अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता पवित्र करतात. मात्र त्याच संसदेत ते अदानींच्या भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने उपमुख्यमंत्री तर केलेच, वर जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत केली. राष्ट्रद्रोही वगैरे आरोप करून शाहरुख खान याला ‘रेड कार्पेट’वरून शपथ सोहळ्यात निमंत्रित केले. पद्मभूषणप्रमाणे एखादा ‘भोंदू भूषण’ असा ‘किताब’ आता तयार करून तो या भाजपच्या पडद्यामागील चाणक्यांना द्यायलाच हवा!

महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार नसून मोदींच्या तंबूतील जम्बो सर्कस आहे काय? असे चित्र दिसू लागले आहे. कालपर्यंत स्वतःला वाघ, सिंह, हत्ती वगैरे शक्तिमान समजणारे प्राणी पिंजऱ्यात बंद होऊन भाजपच्या हुकमावर उड्या मारत आहेत किंवा खेळ करीत आहेत. त्या बदल्यात भाजप त्यांच्या तोंडावर तुकडे फेकत आहे. मिंधे गटास मलईदार खाती हवी असल्याने त्यांनी पिंजऱ्यातच रुसवे-फुगवे सुरू केले, पण त्या सगळ्यात हुशार निघाले अजित पवार. कोणतीही कुरकुर न करता पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व कुरकुर न करण्याच्या बदल्यात काय मिळवले, तर ईडी, आयकर विभागाने बेनामी म्हणून जप्त केलेली त्यांची एक हजार कोटींची संपत्ती. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली ही संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले. 2021 मध्ये भाजपच्या दबावामुळे आयकर, ईडी वगैरे तपास यंत्रणांनी अजित पवारांची ही मालमत्ता जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी जणू शेतात, पोल्ट्रीत, रोजगार हमीवर राब राब राबून, दिवसरात्र मेहनत करून ही मालमत्ता जमा केली होती. स्पार्कलिंग सॉईल, गुरू कमोडिटी, फायर पॉवर अ‍ॅग्री फार्म, निबोध ट्रेडिंग या अजित पवारांच्या स्वयंरोजगार, कुटिरोद्योग, व्यवसायांशी संबंधित कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या. पैशा-अडक्याची चौकशी लावण्यात आली. अटकेची टांगती तलवार ही ‘दादा’ म्हणवून घेणाऱ्यांच्या डोक्यावर लटकवून ठेवण्यात आली व खुद्द पंतप्रधान मोदी यांनी, अजित पवारांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचे जाहीर केले, पण त्यानंतर चौथ्या दिवशी पवार हे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शिरून पावन होऊन आले व काल प्रत्यक्ष मोदी महाराजांच्या साक्षीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन

एक हजार कोटींची

जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली. आयकर, ईडी वगैरे तपास यंत्रणांनी आता काय करावे? त्यांनी केलेली कारवाईच खोटी म्हणायची की मोदी, फडणवीस वगैरेंनी उडवलेला भ्रष्टाचाराचा धुरळा बोगस मानायचा? अजित पवारांना हे लोक चक्की पिसायला पाठवणार होते. ‘बिनलग्नाचा राहीन, पण राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही,’ अशी गर्जना फडणवीसांनी केली होती ती अजित पवारांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच. सिंचन घोटाळ्याचे दोन बैलगाडय़ा भरून पुरावे त्यांच्याकडे होते. ते पुरावे आता कोणत्या अजगराने गिळले? अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली हा मोदी-फडणवीसांचा भ्रष्टाचार व त्यानंतर तत्काळ एक हजार कोटींची जप्त केलेली मालमत्ता मुक्त केली ही जनतेची फसवणूक आहे. याआधी भाजपवासी झालेल्या प्रफुल्ल पटेल यांची तीनशे कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने पवित्र करून सोडली. ती मालमत्ता दाऊद, इक्बाल मिर्ची अशा लोकांशी संबंधित असल्याचे आरोपपत्र ईडीनेच ठेवले होते. ते आरोपपत्र आता दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये किंवा मोदी राहत असलेल्या लोककल्याण मार्गावर लोकांच्या दर्शनासाठी ठेवायला हवे. हा देशाचा अनमोल खजिनाच होता व तो मोदी सरकारने मुक्त केला. ब्रिटिशांनी नेलेल्या कोहिनूर हिऱ्यापेक्षा व आपल्या ऐतिहासिक तलवारीपेक्षा पटेल-पवारांवरील आरोपपत्र व नंतरचे मालमत्ता सुटकेचे ‘क्लीन चिट’ आदेशाचे जाहीरनामे जगभरात संशोधन कार्यासाठी वापरले जातील. आता मुंबईतील दाऊद, छोटा शकील वगैरेंच्या जप्त केलेल्या मालमत्ता पवित्र झाल्या तरी आश्चर्य वाटायला नको. यातून एक स्पष्ट झाले की, भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे व व्होट जिहाद, हिंदू-मुसलमान, भ्रष्टाचारविरोधी मुक्ताफळे फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच ते उधळीत असतात. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या एका बाकावर फक्त 50 हजारांचे बंडल सापडले म्हणून सत्ताधारी एकाच वेळी

बाके व छाती

बडवू लागतात. कुठून आली ही रक्कम? हा पैसा काळा कीगोरा? असे प्रश्न राज्यसभेत विचारू लागले. काय हा भ्रष्टाचारविरोधी पुळका? पण हेच भोंदू लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशांतून मिळवलेली अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता पूजा-अर्चा करून पवित्र करतात, मात्र त्याच संसदेत ते अदानींच्या भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत व फक्त पन्नास हजारांचा हिशेब विरोधकांकडे मागतात? या भोंदूगिरीस तोड नाही. अशा भोंदूगिरीचे प्रखर प्रदर्शन मोदी यांच्या उपस्थितीतल्या शपथ सोहळ्यात दिसले. मोदी महाराजांच्या अंधभक्तांनी म्हणा किंवा समस्त भाजप समर्थकांनी शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकला होता. ‘पठाण’ पाहू नका वगैरे आंदोलने केली होती. याच लोकांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाविरुद्धही आंदोलन केले होते, त्या खानावर, त्याच्या धर्मावर चिखलफेक केली होती. शाहरुखच्या पोराला अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात फसवून बिचाऱ्या शाहरुखलाही आरोपीच्या पिंजऱयात उभे करून शाहरुखच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र त्याच शाहरुखला कालच्या शपथ ग्रहण सोहळय़ासाठी खास आमंत्रित करून अगदी पहिल्या रांगेत बसवले आणि मागचे सगळे विसरून हे खान महाशयही भाजप अंधभक्तांच्या भोंदू मेळय़ात सामील झाले. शाहरुखची मजबुरी आम्ही समजू शकतो, पण या प्रकरणात भाजपच्या भोंदूगिरीची कमालच म्हणायला हवी. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने उपमुख्यमंत्री तर केलेच, वर जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत केली. राष्ट्रद्रोही वगैरे आरोप करून शाहरुख खान याला ‘रेड कार्पेट’वरून शपथ सोहळ्यात निमंत्रित केले. पद्मभूषणप्रमाणे एखादा ‘भोंदू भूषण’ असा ‘किताब’ आता तयार करून तो या भाजपच्या पडद्यामागील चाणक्यांना द्यायलाच हवा!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय
Maratha Kranti Morcha: बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली...
भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर
अल्लू अर्जुनकडे आहेत ‘या’ 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
महिनाभरात सेवा सुधारा अन्यथा 26 जानेवारीला “टॉवरवरून” आंदोलन, युवासेनेचा BSNL ला इशारा