राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत
सांगली जिह्यात गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी पाऊस होत असताना, शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने जिह्यातील अनेक भागांना झोडपून काढले. जोराच्या पावसाचे पाणी शेतात साचले असून, ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसामुळे उसासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिह्यातील वातावरणात बदल होऊन थंडी कमी झाली आहे. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण होते. मागील दोन दिवसांपासून जिह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. परंतु जिह्यात अनेक ठिकाणी शनिवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील अनेक गावांत अवकाळी पाऊस बसरला. विधानसभा निवडणुकीमुळे यंदा ऊसतोडीला विलंब झाला होता. निवडणुकीनंतर गाळप हंगामाने गती घेतली असताना, दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. शनिवारी पहाटे पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.
पावसामुळे जिह्याच्या पश्चिम भागातील ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे ऊसतोडणी यंत्रांची संख्या वाढली आहे. मात्र, शनिवारी पडलेल्या पावसामुळे ऊसतोडणी यंत्रांचे काम ठप्प झाले आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही तोडणी यंत्रे शेतात अडकली आहेत. पावसामुळे तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्षघडांची मणीगळ झाल्याने मोठे नुकसान झाले.
पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता
अहिल्यानगर जिह्यात पुढच्या तीन दिवसांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सात व नऊ डिसेंबर या कालावधीत जिह्याच्या काही भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल. थंडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर जिह्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीत घट कायम राहणार आहे.
अहिल्यानगर जिह्यात सलग तिसऱया वर्षी डिसेंबरमध्ये फटका
जिह्यात डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. पावसामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. आता या नुकसानीचे पंचनामे कधी होणार याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. आज अहिल्यानगर जिह्यामध्ये 24 तासांत 6.7 मिलिमीटर पाऊस झाला. जिह्यातील श्रीरामपूर तसेच कोपरगाव, अकोले, राहता, संगमनेर, नेवासे, राहुरी, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या रब्बी पिके व कांद्याचे रोपवाटिकांचेदेखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिह्यात डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. जिह्यात 2022 पासून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. 2022 तसेच 2023 व आता चालू वर्षी 2024 च्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संपूर्ण जिह्यामध्ये कडाका वाढलेला होता व अशा परिस्थितीच ढगाळ वातावरण तयार झाले व काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाने रब्बी पिकांवर विपरित परिणाम होणार आहे. गव्हाच्या पिकावर मावा, तुडतुडे आणि इतर अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नक्की शेतकऱयांच्या उत्पादन खर्चामध्ये आता वाढ होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List