माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष मुक्त, गुजरातमधील कोर्टाचा निकाल; पोलिसांना झटका
गुजरात येथे 1997 मध्ये कोठडीत छळ केल्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची निर्दोष सुटका झाली आहे. भट्ट यांनी आरोपीला पोलीस कोठडीत मारहाण केल्याचे सबळ पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नाही. पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवत पोरबंदर न्यायालयाने भट्ट यांना दोषमुक्त केले. या निर्णयाने गुजरात पोलिसांना मोठा झटका, तर भट्ट यांना दिलासा मिळाला आहे.
कोठडीत छळाची घटना घडली त्यावेळी भट्ट हे पोरबंदरचे पोलीस अधीक्षक होते. गुजरात पोलिसांनी भट्ट व कॉन्स्टेबल वजुभाई चाऊ या दोघांविरोधात कबुलीजबाबासाठी मारहाण करणे आणि शस्त्राच्या सहाय्याने दुखापत करणे या आरोपांवरून गुन्हा दाखल केला होता, मात्र त्याचे सबळ पुरावे सादर केले नाहीत. त्याआधारे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी मुकेश पंड्या यांनी शनिवारी संजीव भट्ट यांची निर्दोष सुटका केली. भट्ट सध्या राजकोट तुरुंगात आहेत. दुसऱ्या गुह्यांत शिक्षा भोगत असल्याने ते तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. भट्ट यांना 1990 मधील जामनगर कोठडी मृत्यू प्रकरणात जन्मठेप सुनावली होती. तसेच 1996 मध्ये राजस्थानच्या वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज ठेवल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा झाली होती.
प्रकरण काय?
27 वर्षांपूर्वीचे हे जुने प्रकरण आहे. कोठडीत छळ झालेला नारन जाधव 1994 च्या शस्त्रसाठा प्रकरणातील 22 आरोपींपैकी एक होता. त्याला पोरबंदर पोलिसांनी 5 जुलै 1991 रोजी साबरमती तुरुंगातून भट्ट यांच्या घरी नेले होते. तेथे त्याचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप होता.
गुजरात दंगलीनंतर मोदींवर केला होता आरोप
2002 मधील गुजरातच्या दंगलीनंतर संजीव भट्ट चर्चेत आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणात भट्ट यांनी आरोप केला होता. एसआयटीने त्यांच्या आरोपाचे खंडन केले होते. नंतर 2011 मध्ये भट्ट यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तसेच ऑगस्ट 2015 मध्ये गृह मंत्रालयाने बेकायदा गैरहजर राहिल्याप्रकरणी बडतर्फ केले होते. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भूमिका मांडली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List