कबुतरांना उघड्यावर धान्य टाकणे भोवले, तिघांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत सातजणांना हिसका
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे फुप्फुसाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असल्याने कबुतरांना उघड्यावर अन्नपदार्थ न टाकण्याच्या महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कबुतरांना अन्नपदार्थ टाकणे पाच ते सात जणांना भोवले असून पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली आहे, तर काहींचे प्रबोधन करण्यात आले.
वाळलेल्या कबुतराची विष्ठा आणि सूक्ष्म पिसांमधून धूळ किंवा कण श्वासोच्छवासाद्वारे फुप्फुसामध्ये जातात. त्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात. प्रामुख्याने ज्यांना अस्थमा किंवा अॅलर्जी असलेल्या रुग्णांना त्याचा खूप त्रास होऊ शकतो. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करून कबुतरांना अन्नधान्य, अन्नपदार्थ टाकत असतात.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश घनकचरा विभागाला दिला होता. त्यानुसार घनकचरा विभागाकडून कारवाईला सुरुवात करत वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर तसेच स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात पारवे बसतात तेथे धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल केला. दोन दिवसांमध्ये पाच ते सात जणांवर कारवाई केली आहे.
कबुतरांना धान्य टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी गस्त
घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करून ज्या भागात कबुतरांना धान्य टाकले जाते, तेथे सकाळी आणि संध्याकाळी गस्त घातली जात आहे. कबुतरांना धान्य टाकण्यात येऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची, तसेच त्रासाची माहिती नागरिकांना दिली जात आहे. पालिकेने केलेल्या जनजागृतीनंतरदेखील काही ठिकाणी नागरिक कबुतरांना खाद्य टाकत असल्याचे लक्षात आल्याने संबंधित नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. संबंधितांकडून पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
…त्या परिसराची स्वच्छता मोहीम सुरू
कबुतराच्या विष्ठेमुळे खराब झालेल्या परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. विष्ठेमुळे खराब झालेल्या जागा स्वच्छ करण्यासाठी पथक तयार केले असून पुढील काही दिवस ही मोहीमदेखील सुरू ठेवली जाणार असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List