अनेकदा मंत्रीपदं, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद देऊनही अन्याय झाला म्हणता? शरद पवार यांचा रोखठोक सवाल
बारामतीमधील लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघात काका पुतण्या यांची लढत होत आहे. यात अजित पवार यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केले. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र सांगता सभेत वाचून दाखवण्यात आले होते. त्यात अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्याय कसा झाला, असा रोखठोक सवाल केला आहे.
अन्याय कसा काय झाला? अनेकदा मंत्रीपदं, चारवेळा उपमुख्यमंत्री पद , सगळी सत्ता त्यांच्याकडे दिली होती आणि अन्याय झाला असे कसे म्हणता? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जनतेला आता बदल हवा आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राज्यात महाविकास आघाडीचे बहुमताचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काटेवाडीत मतदानानंतर अजित पवार यांनी महायुतीचे सरकार राज्यात येणार असून 175 जागा मिळतील असा दावा केला होता. त्यांनी फक्त 175 सांगितल्या 280 जागा सांगायला हव्या होत्या,असा टोलाही शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List