50 खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा व भाजपचाही सुपडा साफ करा – मल्लिकार्जुन खर्गे
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही 50 खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.
काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे प्रचार सभा झाली. बटेंगें तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या भाजपच्या घोषणांचा समाचार घेत खर्गे म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर सुरू आहे. पण काही लोकांना जाती धर्मांमध्ये भांडणे लावायची आहेत. काँग्रेस मविआचा मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे पालन करून सर्वांना मजबूत करणे हा हेतू आहे. भारतीय जनता पक्ष जाती धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहे, तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले आहे, हे विसरू नका. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढली. देशाची लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून हे काम सर्वांना करायचे आहे, असे आवाहन खर्गे यांनी केले.
भाजप युती सरकारच्या राजवटीत शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. भाजप युती सरकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसच्या 5 गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल असे सांगून 20 तारखेला जनताच भ्रष्टभाजपा युतीला सत्तेतून खाली खेचेल, असा विश्वास मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List