शिवसेनेविरोधात ए,बी,सी, डी सर्व टीम उतरवल्या आहेत, ते सर्व महाराष्ट्रद्रोही आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रे कलानगर मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर हल्ला चढवला. तसेच आदर्श आणि उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी मशाल चिन्हालाच मत द्या. यंदा मतविभागणी होत मतं फुटली तर नशीब फुटेल आणि पुन्हा उपरे सरकार डोक्यावर बसेल, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
या मतदारसंघात प्रचार करण्याची गरज नाही. तुमचे आणि माझे मत एकाच मतपेटीत पडणार आहे. माझे मत तर ठरले आहे, तुमचे मतही ठरले आहे, हे दिसून येत आहे. मशाल या चिन्हालाच मतं मिळणार अशी आम्हाला खात्री आहे. हा माझा मतदारसंघ आहे. आपण याच कलानगर मतदारसंघात राहत आहे. इथल्या अनेक शिवसैनिकांना आपण नावने ओळखतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळापासून त्यांचे शिवसेनेशी नाते आहे. वरुण यांने चांगले अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यामुळे आता जनतेने ठरवायचे आहे की, आपला उमेदवार आता एवढा अभ्यास करून बोलत आहे, तर तो विधानसभेत गेल्यावर आपल्या समस्या अभ्यास करून मांडणार आहे.
अनेक वर्षांपासून येथील समस्या त्याच आहेत. प्रमुख समस्या पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. आपण मुख्यमंत्री असताना हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुरुवात केली होती. दुर्दैवाने कोरोना आला. त्यानंतर गद्दारी करून आपले सरकार पाडण्यात आले. जे प्रकल्प अडलेत, त्या प्रकल्पांना जे नडलेत त्यांना सर्वांना बाजूला फेकून गरज पडली तर सरकारतर्फे हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
आपण इथले मूळ रहिवासी आहोत. अदानी आपल्या डोक्यावर बसला आहेच. मुंबईच्या उपनगरातही आता टॉवर्स उभे राहत आहेत. मुंबईकर आधी उपनगरात गेले, आता काय ते गुजरातला जाणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. इथून सर्व उचलून गुजरातला नेण्याचे काम सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, शिवसेना आणि मुंबई हे नाते कोणीही तोडू शकत नाही. कोस्टल रोड आपल्या प्रयत्नांनी पूर्ण झाला आहे. आम्ही त्याचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करून दाखवले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
आपण महाराष्ट्रभर फिरत आहोत. सर्वत्र सरकारविरोधात प्रचंड असंतोष,उद्रेक, संताप आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार चांगले काम करत होते. त्यांना पूर्णवेळ मिळायला हवा होता. आता मुंबई आपल्यापासून हिसकावून घेण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची,अस्मितेची आणि जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. जिथे शिवसेना आहे तिथे त्यांनी ए,बी,सी, डी सर्व टीम कामाला लावल्या आहेत. ते सर्व महाराष्ट्रद्रोही आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
त्यातील एक पक्षाने झेंडा बदलला, इंजिनाची दिशा बदलली, बिनशर्ट, इनशर्ट पाठिंबा देत आहे. आधी मनसे होते, आता गुजरात नवनिर्माण सेना झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राचा घात करेल, त्यांना देणार गुनसे साथ हे त्यांनी ठरवले आहे. ध्येय, धोरण, दिशा काहीही नाही. राज्याच्या विरोधी असलेल्यांसोबत ते आहेत. त्यामुळे अशा ए,बी,सी टीमला भूलू नका, असा आवाहनही त्यांनी केले. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांची आणि आश्वासनांची माहिती दिली.
मणिपूर जळत असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री महाराष्ट्रात प्रचार करत फइरत होते. आता सभेनाही गर्दी होत नाही, त्यामुळे ते बटेंगे, कटेंगे ,एक है सेफ है करत आहे. मात्र, त्यालाही आता जनता फसत नाही. आपले हिंदुत्व समजल्यामुळे सर्व धर्मिय जनता आपल्यासोबत आहे. कोणालाही अशांतता, दंगली नको आहे. त्यामुळे आम्ही एक आहोतच आणि एकत्र येत महाराष्ट्र आदर्श, उत्तम राज्य घडवणार आहोत, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्यातील निवडणुकीसाठी ते गुजरातमधून 90 हजार जणांना आणत आहेत, म्हणजे त्यांचा हेतू स्वच्छ नाही. त्यांना आमची मुंबई बळकवायची आहे. त्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. येथील त्यांच्या माणसांवरही विश्वास नसल्याने एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी गुजरातमधून माणसे आणली आहेत. त्यामुळे यावेळी मत फुटले तर नशीब फुटेल आणि उपरे पुन्हा डोक्यावर बसतील, त्यामुळे आपल्या भवितव्यासाठी योग्य तो निर्णय घ्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List