रत्नागिरीत डिझेल तस्करीचा पर्दाफाश; 9 जणांना अटक, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे सुरु असलेल्या डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला. पोलीसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. 25 हजार लिटर डिझेलसह 2 कोटी 5 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
समुद्रकिनाऱ्यावर सुरु असलेल्या बेकायदेशीर तस्करीचा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी आढावा घेतला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांचे पथक डिझेल तस्करीवर लक्ष ठेवून होते. अंजनवेल समुद्रकिनारी गस्त घालताना जेटीलगतच्या समुद्राच्या पाण्यामध्ये एक मच्छिमार नौका, एक रिकामा टँकर व एक चारचाकी वाहन दिसून आले. त्यावेळी पोलीसांनी तपासणी केली असता किनाऱ्यावर ही सर्व माणसे डिझेल तस्करीच्या हेतूने मच्छिमार नौकेतील फिशहोलमधून भरुन आणलेले डिझेल एका सक्षन पंप आणि रबर पाईपच्या आधारे एका रिकाम्या टँकरमध्ये भरत होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने डिझेल तस्करी करणाऱ्यांना रंगेहात पकडले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये जयेश नारायण कोळी, वय 27, रा.हर्णे, सिध्देश पांडूरंग कोळी, वय 23, रा.मानखुर्द, नोमान नसीम शेख, वय 35, रा.मुंब्रा, मिलींद मच्छिंद्र ठाकूर, वय 26, रा.पेण, विश्वनाथ गणपत ठाकूर, वय 52, रा.पेण, सोनू अजय सिंग, वय 26, रा.बिहार, निरंजन नामदेव कोळी, वय 32, रा.उरण, अनुजकुमार रावत, वय 22, रा.उत्तरप्रदेश, विवेक विजय शर्मा, वय 22, रा.उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 2 कोटी 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये एक लाकडी मच्छिमार नौका, एक टँकर, 25 हजार लिटर डिझेल, एक चारचाकी वाहन, एक सक्षन पंप, 50 फूट रबर पाईप आणि ८ मोबाईल फोनचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस पांडूरंग गोरे, सुभाष भागणे, विक्रम पाटील, भैरवनाथ सवाईराम, योगश शेट्ये आणि दत्तात्रय कांबळे यांनी केली
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List