अभिप्राय – ललितरम्य साहित्यकृती

अभिप्राय – ललितरम्य साहित्यकृती

>> विवेक वैद्य

रामायण-महाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये हिंदुस्थानी जनमानसाचे कुतूहल सातत्याने वाढवणाऱया साहित्यकृती म्हणून सुपरिचित आहेत. त्यातही महाभारताचा विस्तीर्ण पट अन् त्यात दडलेल्या शेकडो व्यक्तिरेखा यांचे गारुड वाचकांना गेली अनेक वर्षे कायम भुरळ घालत आले आहे. महाभारतकाळातील विविध वृत्ती अन् स्वभावांच्या अनेक व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे देशोदेशीच्या साहित्यामध्ये अजरामर ठरल्या आहेत. तरीही यातील गुरू द्रोणाचार्य या त्यातल्या त्यात दुर्लक्षित व्यक्तिरेखेच्या स्वभावदर्शनाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या वैचारिक आणि व्यावहारिक भूमिकेचा शोध घेणारी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

बी-टेक व एमबीएपर्यंत शिक्षण घेऊन मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत राहिलेले तसेच यशस्वी उद्योजक आणि मार्गदर्शक म्हणून प्रसिद्धीस आलेले कानपूरस्थित प्रकाश अंबादास खरवडकर यांनी गुरू द्रोणाचार्यांच्या चरित्राचा वेध घेत ‘दार उघडा! मी द्रोण आलोय!!’ ही ललितरम्य कादंबरी लिहिलेली आहे. गुरुकुल परंपरेमध्ये ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या आणि त्यासाठी समग्र आयुष्य वेचणाऱया अनेकविध आदर्श गुरुजनांच्या पार्श्वभूमीवर द्वापारयुगातील गुरू द्रोणाचार्यांचे वेगळेपण उठून दिसते ते त्यांच्यामध्ये दडलेल्या अहंभावी, तमोगुणी आणि स्वार्थी दृष्टिकोनामुळे. एकेकाळचा सहाध्यायी आणि पुढील आयुष्यभराचा शत्रू राहिलेल्या द्रुपदराजास धडा शिकविण्यासाठी द्रोणाचार्यांनी स्वतचे गुरूपद पणाला लावलेच, शिवाय त्यासाठी उदात्त गुरू परंपरेची पायमल्ली करण्यासही पुढेमागे पाहिले नाही.

ज्या काळी गुरुकुल पद्धतीस अनुसरून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व ज्ञान मुक्तपणे द्यायचे, सर्व विद्यार्थ्यांसोबत एकसमान
नात्याने वागायचे, त्या काळात राजाच्या पदरी गुरू वा शिक्षक या रूपाने नोकरी पत्करणारे द्रोणाचार्य हे पहिले वेतनधारी शिक्षक होते हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. ‘गुरू’ या प्रचलित आदर्शवत संस्थेची व्याख्या बदलून त्याचे व्यापारीकरण करण्याइतपत अधोगती द्रोणाचार्यांपासून कशा पद्धतीने सुरू झाली याचा समग्र वेध लेखकाने सदर कादंबरीमध्ये प्रभावीपणे घेतलेला आहे. संवादानुरूप व प्रसंगानुरूप मांडणी हे या कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ असून तेच त्याचे बलस्थानही आहे. पराग घळसासी यांच्या उठावदार प्रसंगचित्र रेखाटनांमुळे कादंबरीत जिवंतपणा आला आहे. सोबतच गुरू परंपरा ही संकल्पना नेमकी कशी होती, ज्या परंपरेचे दाखले आजही दिले जातात, तिचे आजच्या काळात नेमके प्रयोजन काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात वाचकाला मिळतील.

पुठ्ठा बांधणीसह उत्तम छपाईसोबत ‘वेगळा’ विचार करावयास लावणारी ही महाभारताच्या पार्श्वभूमीवरील साहित्यकृती
वाचकांनी जरुर वाचावी अशीच आहे.

दार उघडा ! मी द्रोण आलोय!
लेखक व प्रकाशक – प्रकाश अंबादास खरवडकर
प्रसंगचित्रे – पराग घळसासी
लेखन – विवेक दिगंबर वैद्य
पृष्ठसंख्या – 272
किंमत – रु. 400

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट ‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाने आशूला प्रपोज केल्याचं संपदा सर्वांना सांगते....
आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन, लष्कर-ए-तैयबाच्या सीईओच्या नावे फोन
मणिपुरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी… राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदींना केले आवाहन
गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा, ISI कनेक्शन उघड
Manipur violence – मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह मंत्री-आमदारांच्या घरांवर हल्ला
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला, हिजबुल्लाहने दोन रॉकेट डागले