पिंपरी, चिंचवड, भोसरीमधून 13 जणांचे अर्ज बाद
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत भोसरी मतदारसंघातून सहाजणांचे अर्ज बाद झाले. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शपथपत्रात माहिती लपविली व अपूर्ण असल्याबाबत पाच उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी हरकत घेतली होती. मात्र, तपासणीनंतर बनसोडे यांचा अर्ज वैध ठरविण्यात पिंपरीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. चिंचवड मतदारसंघातून चार उमेदवारांचे पाच अर्ज बाद झाले. त्यामध्ये भोसरीतून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, चिंचवडमधून आमदार अश्विनी जगताप यांचाही अर्ज बाद झाला आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी बुधवारी (दि. 30) सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत पार पडली. भोसरी मतदारसंघासाठी चिखली, पूर्णानगर येथील बहुउद्देशीय हॉल, पिंपरी मतदारसंघासाठी निगडी-प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन आणि चिंचवड मतदारसंघासाठी थेरगाव येथील महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे. या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये ही छाननीप्रक्रिया झाली. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अर्जाची छाननी करण्यात आली. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता.
महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर राजकीय पक्षांच्या क्षणाक्षणात बदलणाऱ्या घडामोडींमुळे अर्ज दाखल करणाऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे अर्ज छाननीप्रक्रियेचीही सर्वांना उत्सुकता होती. कोणाचा अर्ज बाद होतो हादेखील औत्सुक्याचा विषय होता. छाननी प्रक्रियेनंतर आता निवडणूक रिंगणातील चुरस वाढण्यास सुरुवात झाली आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच याचदिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
पिंपरीतून उमेदवारांचे अर्ज बाद
पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 39 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले होते. छाननीप्रक्रियेत त्यापैकी तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामध्ये कैलास बनसोडे, लक्ष्मण शिरोळे, बाबा बाळू कांबळे यांचा समावेश आहे. तर, आता निवडणूक रिंगणात 36 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
चिंचवडमध्ये चार उमेदवारांचे पाच अर्ज बाद चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम उमेदवारांनी 44 अर्ज दाखल करसासाराम मुदतावाचे 5 अर्ज छाननीप्रक्रियेत बाद ठरले, तर 28 उमेदवारांचे अर्ज वैध झाले आहेत. त्यामध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांचादेखील अर्ज बाद झाला. पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म नसल्याने त्यांचा डमी म्हणून भरलेला अर्ज बाद झाला आहे. त्यांच्यासोबत आनंद मोळे, जितेंद्र वाडघरे, जसविंदर सिंग, इंदूपाल सिंग रत्तू या चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. नामनिर्देशनपत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम नुसार हे अर्ज बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.
आमदार सौभाग्यवतींसह सहाजणांचे अर्ज बाद
भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 6 उमेदवारांचे 8 अर्ज छाननीप्रक्रियेत बाद ठरले. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे यांनी भाजपकडून डमी उमेदवारी अर्ज सादर केला होता. तो बाद झाला आहे. तसेच अपक्ष अर्ज भरलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, राहुल नेवाळे, ज्ञानेश्वर बोराटे, प्रकाश डोळस, विकासराजे केदारी या सहाजणांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली. उर्वरित 18 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List