आर. आर. पाटील यांच्यावरील आरोपावरून अजितदादा, फडणवीसांवर टीकेचा भडीमार
सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकलो असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यावरून अजितदादांसह त्यांची पाठराखण करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा चौफेर भडिमार होत आहे.
ती फाईल माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही
आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही आणि मी कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी केली नाही, तसेच अजित पवारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेशही दिले नाहीत, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलणे योग्य नाही
आर. आर. आबा आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही, पण एवढेच सांगतो की अजित पवार यांची चौकशी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातच सुरू झाली होती, असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
चौकशी झाली पाहिजे
‘आरोप आधी झाले आणि त्यानंतर फाईलवर सही झाली. या फाईलचं पुढे काय झालं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. मंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतलेली असताना अजित पवार यांना फाईल कशी दाखवली याची चौकशी झाली पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.’
आबांना कुणी मानसिक त्रास दिला हे वेळ आल्यावर सांगेन – रोहित पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले पिता आर. आर. पाटील यांना सर्वाधिक मानसिक त्रास कुणी दिला हे वेळ आल्यावर सांगेन, अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली. अजित पवारांनी आबांवर असे आरोप करणे दुःखदायक असून त्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबासह तासगाव-कवठे महांकाळमधील जनतेलाही मोठं दुःख झाले आहे, असे आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List