मतदानाचे लाईव्ह प्रक्षेपण करा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपक्ष उमेदवाराने केली मागणी
विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह प्रक्षेपण करा, राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रचारात सरकारी-सार्वजनिक मालमत्तांचा वापर रोखा, अशी मागणी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रोहन सातोने यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संपूर्ण राज्यभरातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पारदर्शक आणि खुल्या वातावरणात व्हावे, या उद्देशाने विविध स्वरूपाची खबरदारी बाळगण्याची मागणी सातोने यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव व इतरांना निवेदन दिले आहे. राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान कक्षाबाहेर बसवले पाहिजे. मतदान कक्षात केवळ मतदारालाच प्रवेश असावा, मतदानाचे लाईव्ह प्रक्षेपण मतदान कक्षाबाहेर केले पाहिजे, मतदान केंद्राच्या 500 मीटरच्या आवारात कुठलेही विद्युत उपकरण वापरण्यास मुभा देऊ नये, तसेच सेल्फी पॉईंटही मतदान केंद्रापासून 500 मीटरच्या बाहेर ठेवावा, काही राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तांचा होणारा वापर रोखण्यात यावा, प्रचारावर केल्या जाणाऱ्या खर्चाची
पूर्णपणे पडताळणी करावी, प्रचार कार्यालयांवर दिवस-रात्र पाळत ठेवावी, अशा मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मतमोजणी ठिकाणी प्रवेश नको
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना तसेच याआधी मतमोजणीच्या ठिकाणी गैरकृत्य केलेल्या व्यक्तींना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, अशीही मागणी रोहन सातोने यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही या मागण्यांच्या निवेदनाची प्रत दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List