20 तारखेला चुकलात तर हे आपला महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा झंझावाती प्रचार सुरू असून शिवसेनेच्या प्रचारसभांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज वाशीम, यवतमाळ आणि जळगाव जिह्यांत पाच सभा झाल्या. या सभांना तुडुंब गर्दी उसळली होती. याच गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यांवर हल्ला चढवला. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिशाहीन करून ठेवला आहे. म्हणूनच ही निवडणूक माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या रक्षणाची असून 20 तारखेला चुकलात तर हे आपला महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मतदारराजाला सावध केले.
यवतमाळ, वाशीम, जळगावात सोमवारी उन्मेष पाटील, वैशाली सूर्यवंशी, प्रभाकर सोनवणे, डॉ. सिद्धार्थ देवळे, ज्ञायक पाटणी, अमित झनक, माणिकराव ठाकरे या उमेदवारांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा झाल्या. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
मोदींनी बहिणींच्या घरातले धन लुटले
लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणाऱया पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी नोटबंदीची आठवण करून दिली. अनेक गृहिणी घरच्यासाठी काही पैसे डाळीचा डबा, पिठाच्या डब्यांमध्ये लपवून ठेवतात. मोदींनी सांगितले होते की परदेशातून काळा पैसा आणू. पण त्यांनी आमच्या बहिणींच्या घरातले धन लुटले. नोटबंदी करून त्यांचे सर्व पैसे शून्य करून टाकले, अशी टीका करतानाच, गोरगरीबांना रांगेत का उभे केलेत? कुणी दिला तुम्हाला अधिकार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी-शहा इकडे भाषण करत होते तेव्हा मणिपूरमध्ये एका तीन मुलांच्या आईला जिवंत जाळून टाकले. तिचे घर पेटवून टाकले. त्याबद्दल मोदी-शहा बोलतच नाहीत. महिलांच्या सुरक्षेबद्दल काहीच बोलत नाही, असे टीकास्त्रही उद्धव ठाकरे यांनी सोडले. भाजपचे करंटे कुणबी समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलले. एवढा माज आला या भाजपवाल्यांना? समाजाबद्दल वेडेवाकडे बोलायला लागले. इथे काय किडे मकोडे राहतात… का गांडुळ आहेत… गांडुळांची पैदास महाराष्ट्रात होत नाही, वाघांची होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
चंद्रपूर आणि परिसर वाघांचा परिसर आहे. गेल्या वेळेला चंद्रपूरकरांनी कमाल करून दाखवली. मुनगंटीवार महाराजांची वाघनखे घेऊन आला त्याला आडवा करून टाकला. मुनगंटीवारही त्या वेळी बहीण-भावाच्या नात्याबद्दल हिणकस बोलले होते. मोदींना ते चालते का? शिवसेनेला हिंदुत्ववादाबद्दल प्रश्न विचारता पण बहीण-भावाच्या नात्याबद्दल वाईट बोलणारा माणूस मंत्रिमंडळात ठेवता? कुणबी समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलणारी माणसे तुम्हाला चालतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना उद्देशून केला.
भाजपवाले थापाडे
मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशी क्लिप भाजपवाले फिरवताहेत. बाळासाहेब तसे बोललेच होते. पण भाजपलाही ते कमळाबाई बोलले होते. कमळाबाईची मस्ती चालू द्यायची नाही हेसुद्धा ते बोलले होते, असे उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले. 25 वर्षे भाजपबरोबर युतीमध्ये राहून शिवसेनेची भाजपा झाली नाही, मग काँग्रेस कशी होईल? भाजप कश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीबरोबर बसला तेव्हा तो त्यांचा झाला का? जे ‘संघमुक्त भारत’ बोलले होते त्या नितीश कुमारांसोबत भाजपा बसली, मग भाजपचा जेडीयू झाला का? या सर्व थापा आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जा चंद्रावर एकदाचे
अडीच वर्षे कोरोनाचा काळ होता. अतिशय खडतर वेळ होती. पण याही काळात आपण महाराष्ट्रात साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. पण या लाचारांनी महाराष्ट्र गुजरातच्या झोळीत टाकायचेच ठरवले आहे. सगळे देऊनही यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान, यूनोमध्ये जायचे आहे. जा एकदाचे चंद्रावर, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला.
मोठमोठय़ा जाहिराती यांचे थोबडे दाखवण्यासाठीच!
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी अमरावतीत घेतलेल्या एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलाखतीचा उल्लेख केला. सव्वालाखांच्या कर्जासाठी शेतकऱयाने आत्महत्या केली. परिस्थितीअभावी एका मुलाला शिक्षण सोडावे लागले. दुसऱया मुलाने शेती करण्यास नकार दिला. हे दिवस महाराष्ट्रावर आलेत, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी पंधराशे रूपयांत घर चालते का असा सवाल केला. पण तरीही यांची जाहिरातबाजी चालूच आहे. मोठमोठय़ा जाहिराती यांचे थोबडे दाखवण्यासाठी! त्यासाठी आपण सरकार येताच महिलांना तीन हजार रूपये तसेच मुलींसोबत मुलांनाही शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कायदा सर्वांसाठी सारखाच
कायदा सर्वांसाठी समान आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, घटनेची चौकट सगळय़ांसाठी सारखीच आहे. त्यामुळे जो कायदा मला लागू आहे, तोच इतरांनाही आहे. माझी बॅग तपासली तशीच मोदी, शहा, देवेंद्र, मिंधे, अजित पवारांच्या बॅगा तपासण्याची हिंमत निवडणूक आयोग दाखवणार आहे का? नव्हे, त्यांच्या बॅगा तपासल्याच पाहिजेत. विशेष करून महाराष्ट्रातून परत जाताना मोदी, शहांच्या बॅगा तपासा, कारण महाराष्ट्र लुटून नेत आहेत! असा जबरदस्त भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
भाजपा म्हणते… बटेंगे तो कटेंगे. पण भाजपची खरी नीती आहे महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो में बाटेंगे… लूट चाललीय महाराष्ट्राची. सर्वसामान्य जनतेला भुकेपंगाल ठेवायचे. महाराष्ट्राने भीक मागितली पाहिजे अदानी आणि मोदी-शहांकडे. मग हे येऊन सांगणार की देखो हमने क्या किया.
…मग पंतप्रधानांनी महाविकास आघाडीचाही प्रचार करावा
लोकशाहीत कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही. पंतप्रधान भाजपचे नाहीत, देशाचे आहेत. सगळ्यांशी सारखा वागेन अशी शपथ त्यांनी घेतली आहे. तुम्हाला हा लाडका, हा आवडता, तो नावडता हे करण्याचा अधिकार राहत नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारालाही यायला हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पंतप्रधान येताहेत, पण ते वायुदलाचे विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे, असे ते म्हणाले. संविधान बदलण्याचा भाजपचा मनसुबा आहे असे आम्ही म्हणतो ते याचसाठी, असेही ते पुढे म्हणाले.
छत्रपतींचे नाहीतर काय
मोदींचे मंदिर बांधणार!
राजकोटावरचा महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्ट कारभारामुळेच महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याचा सूड घ्यावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इव्हीएम नव्हे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले. पुतळा पडल्यानंतर मोदींनी माफी मागितली पण गुर्मीत, फडणवीसांनी तर तेवढेही सौजन्य दाखवले नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. दसरा मेळाव्यात मी प्रत्येक जिल्हय़ात छत्रपतींचे मंदिर बांधणार असे वचन दिले आहे. मंदिर छत्रपतींचे नाही बांधायचे तर काय मोदींचे बांधायचे, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
…नाहीतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोदी-शहांच्या बॅगा तपासतील
वणीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले. निवडणूक प्रचाराला आलो की यंत्रणांचे अधिकारी आमच्या बॅगा तपासतात. मग सर्वांच्याच तपासायला हव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत, दाढीवाला मिंधे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा गुलाबी जॅकेटवाले अजित पवार असोत… प्रचाराला आले तर त्यांच्या बॅगाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी तपासल्या पाहिजेत, नाहीतर शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील, होऊन जाऊ द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘‘तुम्हाला चौकशीसाठी कुणी अडवले तर ते अधिकारी कुठे काम करतात ते आधी तपासा, त्यांचे ओळखपत्र तपासा. कुठे नोकरीला आहेत त्या नोकरीचे अपॉईंटमेंट लेटर तपासा. तुमचे खिसे तपासतात तसे त्यांचेही तपासा. नाक्यानाक्यांवर तुम्हाला तपासले तर तपासणी करणाऱयांचीही तपासणी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार यंत्रणांच्या अधिकाऱयांना आहे तसे प्रचाराला जो कुणी येईल त्यांच्या बॅगा तपासण्याचा अधिकार मतदारांनाही आहे आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक बॅगा घेऊन फिरत होते, परंतु त्यांच्या बॅगांची तपासणी केली जात नव्हती याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी या वेळी करून दिली. त्या कपडय़ाच्या बॅगा होत्या असा दावा मिंध्यांनी केला होता. उन्हाळ्यात एवढे कपडे घालतात एका वेळी, असा सवाल त्यांनी केला.
निदान लोकशाहीला तरी न्याय द्या
काय चालले आहे देशात? गेली अडीच वर्षे घटनाबाहय़ सरकार महाराष्ट्रात आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. तीन न्यायमूर्ती बदलले. पण शांतता कोर्ट चालू आहे! अलिकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाले. उत्तम प्रवचनकार, चांगली भाषणे झोडतात. पण निकाल मात्र देत नाहीत. काही दिवसांपुर्वी चंद्रचूड म्हणाले होते, ‘राममंदिराचा निकाल देण्यापूर्वी अस्वस्थ होतो. यमाई देवीनेच बुद्धी दिली.’ मी तर म्हणतो, चंद्रचूड तिथे बसण्यापूर्वी आम्ही त्यांना उचलून यमाईच्या दर्शनाला नेले असते. हा लढा शिवसेनेचा नाही. लोकशाहीचा आहे. संविधानाचे पालन होते की नाही, याचा आहे. आता नवे सरन्यायाधीश आले आहेत. त्यांच्याकडे प्रार्थना आहे, निदान लोकशाहीला तरी न्याय द्या! आम्ही तर आता जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. कारण जनता सगळे उघडय़ा बघत असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
जातीपातीत कलह करण्याचा मनसुबा
पंतप्रधान मोदी यांनी काल नांदेडमध्ये शिवसेनाप्रमुखांची स्तुती केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाळासाहेबांबद्दल चार शब्द चांगले बोलून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले. मोदीजी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवतीर्थावर झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेअगोदर राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले होते. तुम्हाला व्हिडीओ पाठवतो. कशासाठी या सगळय़ा उचापती! हिंदू-मुस्लिम दंगली होत नाहीत. मुसलमानांना यांचा कावा कळला म्हणून ते आमच्यासोबत आले. मग हिंदूमध्येच कलह माजवण्याचे कारस्थान रचले. जातीपातीत कलह माजवायचा आणि आपली पोळी भाजायची. पण आता बस्स झाले! आता तुम्हाला महाराष्ट्र लुटू देणार नाही. आपल्याला महाराष्ट्र वाचवावाच लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
लोहारा, धाराशिवमध्ये
आज तोफ धडाडणार!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ मंगळवारी धाराशिव जिल्हय़ात धडाडणार आहे. उमरग्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ दुपारी 1 वाजता, तर धाराशिव मतदारसंघाचे उमेदवार पैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारार्थ सायं. 5 वाजता जाहीर सभा होणार आहे.
फटकारे
मोकळ्या वातावरणात निवडणुका होऊन जाऊ द्या. तुम्ही आमचे तपासा आम्ही तुमचे तपासतो. सगळंच उघडा. काही हरकत नाही. हा जो नालायकपणा सुरू आहे याला मी लोकशाही मानायला तयार नाही. ही लोकशाही असू शकत नाही.
मोदी-शहा हल्ली रोज महाराष्ट्रात येताहेत. वेगळं काहीच बोलत नाहीत. हिंमत असेल तर यांच्यावर बोला, त्यांच्यावर बोला इतकेच. अहो आम्ही तुमच्यावरच बोलतोय ना. आणखीन काय हिंमत दाखवायची.
मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी होती. भाजपवाले आता मुंबईचे महत्त्व मारताहेत. सर्व गुजरातला नेऊ इच्छित आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अदानींच्या घशात घातलेली जमीन काढून मुंबई व परिसरातील जमिनीवर भूमिपुत्रांसाठी परवडणारी घरे बांधू.
मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मते मागावी लागताहेत. ही बाळासाहेबांची पुण्याई आहे आणि शिवसैनिकांचे कर्तुत्व आहे. आता ते बाळासाहेबांची तारीफ करताहेत. त्यांना कळले की, महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही. सडकी… कुसकी… नासकी. इथे फक्त एकच नाणे चालते ते म्हणजे हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे.
…मग महाराष्ट्राने काय अदानीची भांडी घासायची
अदानी हा राक्षस केवळ मुंबईपुरता नाही. चंद्रपूरची शाळा, देशातले एअरपोर्ट मोदी सरकारने अदानीला दिले. वाढवण बंदरसुद्धा दाखवायला जेएनपीटीकडे पण ते अदानीकडे जाणार. वीज प्रकल्पही अदानीकडे दिले गेलेत. त्याचा करारही झाला आहे. आपण वापरतो ती वीजही अदानीकडून घ्यायची. पण वीज प्रकल्प गुजरातला उभारला गेला. त्यामुळे गुजरातमधील जमिनींचे भाव वाढले. गुजरातमधील लोकांना नोकऱया मिळाल्या. मग महाराष्ट्राने काय फक्त त्यांची भांडी घासायची असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी मानली जात होतं. आता हे महत्त्व मारून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांवर तोफ डागली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List