प्रवासी साखरझोपेत, बसनं अचानक पेट घेतला; टोलनाक्यावरील कर्मचारी देवासारखे धावून आले
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खासगी बसचे टायर फुटून अचानक आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास खडका फाटा टोलनाका येथे ही घटना घडली. आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली, मात्र प्रवाशांसह वाहक, चालकाने वेळीच बाहेर उड्या घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी रात्री पुण्यातील भोसरी येथून साईराम ट्रॅव्हल्सची खासगी बस (क्र. एम एच 19 वाय 3123) जळगावमधील जामोदकडे निघाली होती. बसमध्ये 15 प्रवाशांसह चालक, वाहक होते. ही बस नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाका येथे आली असता अचानक आग लागली. बसचे टायर फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
प्रवाशांनी भरलेली बस पेटल्याचे कळताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले व वाहतूक सुरळीत चालू केली.भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List