पोलीस डायरी – पोलिसांची ‘डॉन’ पोरं! बिष्णोईला कोण वाढवत आहे?

पोलीस डायरी – पोलिसांची ‘डॉन’ पोरं! बिष्णोईला कोण वाढवत आहे?

>> प्रभाकर पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या शख व पैसे पुरविणाऱ्या 10 आरोपींना उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब व महाराष्ट्रातील डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, अकोला, अंबरनाथ आदी भागांतून मुंबई क्राइम बॅचच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात अटक केली. परंतु हत्येचे खरे सूत्रधार अद्यापि हाती न लागल्यामुळे हत्येचा खरा हेतू स्पष्ट झालेला नाही व होणारही नाही. बाबा सिद्दिकी यांची हत्या गेल्या दशकभरापासून जेलमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पंजाबच्या लॉरेन्स बिष्णोई या गुंडाच्या इशाऱ्यावरून घडवून आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक शुभदीप सिंग सिध्दू मुसेवाला यालाही लॉरेन्स बिष्णोईने आपल्या हस्तकांमार्फत गोळ्या घालून ठार मारले. सिध्दू मुसेवाला हा पंजाब काँग्रेसचा सदस्य व खलिस्तानवाद्यांचा समर्थक होता.

लॉरेन्सने सिध्दू मुसेवाला याला मारल्यानंतर त्याचे नाव देशभरात चर्चेत आले. त्यानंतर हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवादी कॅनेडियन शीख नेत्याला 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या हत्येप्रकरणीही लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित 3 आरोपींना अटक करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई अंडरवर्ल्ड डॉन म्हणून नावारूपास आला. दिल्लीतील राज्यकर्त्यांना कॅनडातील खलिस्तानी चळवळ मोडून काढायची आहे. कॅनडातील फुटीरवादी शीख नेत्यांनी भिंद्रनवाले या अतिरेक्याने सुरू केलेली ही चळवळ जिवंत ठेवली आहे. त्या कॅनडातील नेत्यांचे उच्चाटन करण्याचे केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. गुरपतवंत सिंग पन्नू या शीख नेत्याचीही भारतीयांकडून (कॅनडात) हत्या करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी केला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे (रॉ) माजी अधिकारी विकास यादव यांच्यावर हा ठपका ठेवला आहे.

पंजाबचा गायक सिध्दू मुसेवाला, त्यानंतर हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्या प्रकरणात लेरिन्स बिष्णोईचे नाव गाजत असतानाच आता माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्याही हत्येत लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव पुढे आल्याने चर्चाना उधाण आले आहे. या सर्व हत्या व हल्ले हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या एजंटांच्या इशाऱ्यावरून घडवून आणण्यात येत आहेत की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दाऊद हा ‘आयएसआय’ साठी काम करतो, तर छोटा राजन ‘रॉ’साठी काम करीत होता. आता तो वयोमानाने थकला आहे. बँकॉकमध्ये छोटा राजनवर २००० साली हल्ला झाल्यानंतर त्याला बँकॉकच्या रुग्णालयातून पळवून नेण्याचे काम त्यांचे साथीदार संतोष शेट्टी, भरत नेपाळी, बंटी पांडे, फरीद तनाशा यांनी जरी केले असले तरी छोटा राजनला हेलिकॉप्टरमधून कंबोडियामध्ये सुरक्षित पोहोचविण्याचे काम आपल्या केंद्रीय यंत्रणांच्या एजंटनी केले होते. छोटा राजन या मुंबईतील गैंगस्टरचा बऱ्या-वाईट कामांसाठी केंद्रीय यंत्रणांनी गेली दोन-तीन दशके वापर करून घेतला मुंबईतील बॉम्बस्फोटांत सहभागी असलेल्या व जामिनावर सुटलेल्या बऱ्याच आरोपींना छोटा राजनने आपल्या हस्तकांमार्फत मुंबईत गोळ्या घालून ठार मारले व त्याने हिंदू डॉन बनण्याचा प्रयत्न केला. असा हा आरोपी सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये गेल्या 10 वर्षांपासून आहे. छोटा राजनवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आदी 70 च्या वर केसेस मुंबईत दाखल आहेत, परंतु मुंबई क्राइम ब्रँचने त्याची कधीही चौकशी केली नाही, अथवा मुंबई पोलिसांना करू दिली नाही. सध्या तिहार जेलमध्ये छोटा राजन आरामात आहे. त्याला तेथे हवे ते मिळते. लॉरेन्स बिष्णोईचेही तेच आहे. बिष्णोईचा वापर सुपारी व पॉलिटिकल किलिंगसाठी मोठ्या प्रमाणात करून घेतला जात आहे त्यामुळे लॉरन्सची कधी कसून चौकशी झाली नाही. त्याचा गेम’ होईल म्हणून त्याला जेलमधूनही बाहेर काढले जात नाही. इतकी त्याची काळजी सत्ताधाऱ्यांकडून घेतली जात आहे. आज बिष्णोईसाठी देशभरात 700 च्या वर ‘पोरं’ काम करतात. त्याचे हे साम्राज्य कसे आणि कुणी वाढविले? त्याच्याकडे महागडी परदेशी पिस्तुले व पैसे येतात कुठून? जेलमध्ये राहून त्याचे मुलाखतीचे व्हिडीओ कसे व्हायरल होतात? उघडपणे बाबा सिद्दिकीच्या हत्येची किंवा कॅनडात घडणाऱ्या प्रत्येक गोळीबाराची बिष्णोईचा भाऊ व त्याचे साथीदार कशी काय जबाबदारी घेतात? त्याला हिंदू डॉन कोण बनवीत आहे? तो जेलमधून का बाहेर येत नाही? त्याला जेलच सुरक्षित का वाटत आहे? याचे कोडेच आहे.

मुंबईत गँगवॉर वाढल्यानंतर अरुण गवळीला जामीन मिळूनही तो जेलबाहेर येत नव्हता. जेलमध्ये राहणेच त्याने पसंत केले होते. त्याचा कट्टर दुश्मन अमर नाईक पोलीस चकमकीत जेव्हा विजय साळसकर यांच्याकडून मारला गेला, त्याच्या मार्गातील काटा दूर झाला. तेव्हा गवळी जेलमधून बाहेर आला व त्याने अ.भा. सेना नावाचा पक्ष काढला व आमदार म्हणून भायखळ्यातून तो निवडूनही आला. पुण्याचा बडा गैंगस्टर शरद मोहोळ याने येरवडा जेलमध्ये एका बॉम्बस्फोट आरोपीची हत्या केल्यानंतर त्यालाही त्याचे समर्थक हिंदू डॉन बोलू लागले. तेव्हा त्याने आपल्या पत्नीला भाजपात प्रवेश घ्यायला लावला. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तोही भाजपात प्रवेश करणार होता, परंतु त्यापूर्वीच पुण्यातील प्रतिस्पर्धी टोळीने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात शरद मोहोळची त्याच्या घराजवळच गोळ्या घालून हत्या केली. लॉरेन्स बिष्णोईवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण तसेच अंमली पदार्थांची तस्करी आदी 50 च्या वर गंभीर गुन्हयांच्या नोंदी आहेत. अशा या खतरनाक गुंडाला आता हिंदू डॉन म्हणून संबोधले जाते आहे. दाऊद हा एका पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. लॉरेन्सही पंजाबच्या पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. दोघांची कार्यपद्धती सारखी आहे. दाऊद पाकिस्तानात पळाला तर लॉरेन्स आपण प्रतिस्पर्ध्याकडून मारले जाऊ म्हणून जेलमध्ये गेल्या 10 वर्षांपासून आराम करीत आहे व सत्ताधारी आपल्या मार्गातील काटा काढण्यासाठी त्याचा वापर करून घेत आहेत. हे देशाच्या हिताचे नाही, कारण बाबा सिद्दिकीची हत्या, सलमानच्या घरावरील हल्ला, त्याला येणाऱ्या धमक्या यामुळे हिंदू-मुस्लिम असे गैंगवॉर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. नव्हे हिंदू-मुस्लिम प्रवक्त्यांमध्ये आतापासून ते सुरू झाले आहे. राजकीय फायद्यासाठी बिष्णोईचा वापर करणाऱ्या राजकीय नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महान संत शरदचंद्रजी पवार… राज ठाकरे यांची खोचक टीका काय? महान संत शरदचंद्रजी पवार… राज ठाकरे यांची खोचक टीका काय?
राज्यात निवडणूकांचा प्रचाराला वेग आला आहे. राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा सुरु आहे.राज ठाकरे यांनी लातूर येथे झालेल्या भाषणात शरद...
सनी देओल-डिंपल कपाडियाच्या अफेअरबद्दल जेव्हा अमृता म्हणाली, “नात्याचं भविष्य..”
अनुष्काने पहिल्यांदाच शेअर केला मुलगा अकायचा फोटो
अक्षय कुमार ‘इश्कबाज’, तर बिकिनीत मुलींना पाहिल्यानंतर गोविंदा…, बॉलिवूड सेलिब्रिटींचे रहस्य समोर
बाळ कधी होणार? प्रश्नावर प्रिया बापटचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘मी आता थकलीये कारण…’
रोज पहाटे 3-4 वाजता जाग येते? पडला ना प्रश्न? असू शकते ‘या’ समस्यांचे लक्षण; समजून घ्या
सिगारेटचे व्यसन सोडायचे? रोज ‘हे’ काम करा, व्यसनमुक्त व्हा!