तीस वर्षे जबाबदारी देऊनही कामे झाली नाहीत! शरद पवार यांचा अजितदादांवर निशाणा
‘त्यांना तीस वर्षे जबाबदारी दिली; पण तरीही तालुक्यात काहीच कामे झाली नाहीत. हातात सत्ता देऊनही त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे आता नवीन नेतृत्वाला संधी द्यावी लागेल,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सुपे येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेवर येथील शेतकरी आक्रमक आहेत. तोच मुद्दा उचलून धरत शरद पवार म्हणाले, ‘गेली तीस वर्षे ज्यांना जबाबदारी दिली, त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर अधिक लक्ष देण्याची गरज होती; पण तसे झाले नाही.’
शरद पवार यांनी आज सुप्यासह सोमेश्वरनगर, शिर्सुफळ, चौधरवस्ती या गावांत सभा घेतली. या सभांमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत अजित पवारांवर टीका केली. तसेच लोकसभेचा निकाल याही वेळी कायम ठेवावा, असे आवाहन केले.
शरद पवार म्हणाले, ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात ना? मग एका राज्याचे काम कशाला करता? अगदीच तुम्हाला एका राज्याचे काम करायचे असेल, तर मग मुख्यमंत्री व्हा. आमची काही हरकत नाही; परंतु आता महाराष्ट्रातील सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही.’
‘विमान तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात काढा, अशी मी विनंती केली होती. देशाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान मोदींनी काय जादू केली माहीत नाही, विमान तयार करण्याचा कारखाना लातूरला होणार होता, तो गुजरातला नेला, ‘वेदान्ता’चा कारखाना महाराष्ट्रात व्हायचा होता, तो गुजरातला नेला,’ असेही शरद पवार म्हणाले.
कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
अजित पवार विविध सभांमध्ये शरद पवार तुम्हाला भावनिक करतील, असे सांगत आहेत. त्याचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले, ‘काही लोक सांगतात, मी भावनिक होईन. भावना वगैरे काही नसतात. लोकांच्या मनात जे आहे त्यालाच लोक निवडून देतात; दुसरं काही कारण नाही. कोणालाही भावनिक करण्याची काही गरज नाही.’
नवीन नेतृत्व तयार करण्याची गरज
आता नवीन नेतृत्व तयार केले पाहिजे, असे आवाहन करून शरद पवार म्हणाले की, ‘राज्य नीट चाललं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे. बारामतीत युगेंद्र पवार यांना आम्ही संधी दिली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अनेक तरुण आम्ही उभे केले आहेत. महाविकास आघाडीने तरुण नेतृत्वाची फळी उभी केली आहे, त्यासाठी जनतेची मदत हवी आहे.’
आता समाजकारण करणार!
‘मी आता सत्तेत नाही; परंतु राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष शिल्लक आहे. यानंतर राज्यसभेवर जायचे की नाही, याचा विचार मला करावा लागेल. पण मी आता कोणतीही निवडणूक लढणार नाही. आतापर्यंत 14 निवडणुका मी लढवल्या. तुम्ही असे लोक आहात की, एकदाही मला घरी पाठवलं नाही. प्रत्येक वेळी निवडूनच देत आलात. पण कुठेतरी थांबले पाहिजे. आता मला कोणतीही निवडणूक नको, सत्ता नको. मात्र, समाजकारण करीत राहणार आणि लोकांचे काम मी करीत राहणार आहे,’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List