पुजारा-रहाणे, तुम्हा दोघांना आम्ही मिस करतोय!
न्यूझीलंडकडून मिळालेला पराभव क्रिकेटप्रेमींच्या अक्षरशः जिव्हारी लागलाय. हा पराभव हिंदुस्थानी क्रिकेटची मान झुकवणारा ठरल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी आता रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंवरही टीकास्त्र सोडायला सुरुवात केली असून संघातील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर सारेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या धिरोदात्त फलंदाजांना मिस करू लागलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटींच्या मालिकेसाठी या दोघांची संघात निवड करावी, अशी मागणीही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
हिंदुस्थानी संघाकडे एकापेक्षा एक फलंदाज असूनही ते न्यूझीलंडच्या फिरकीवर अक्षरशः थरथरले. काल 147 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यातही हिंदुस्थानचे धडाकेबाज फलंदाज तोंडावर आपटले. त्यामुळे अवघ्या देशभरात हिंदुस्थानी फलंदाजांवर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे या दोघांना आता निर्वाणीचा इशारा द्यावा. तसेच या दोघांसह अपयशी ठरलेल्या खेळाडूंनाही सक्तीची विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संघात स्थान द्यावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. मात्र फिरकीसमोर उभे राहण्यास अपयशी ठरलेल्या फलंदाजांऐवजी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला संघात परत स्थान द्या, अशी मागणी चाहते करू लागले आहेत. सध्या हेच दोघे आहेत, जे ऑस्ट्रेलियन वेगवान माऱयापुढे नांगर टाकू शकतात. संघात असलेले टी-20 स्टार क्रिकेटपटूंना बसवून गोलंदाजांच्या आव्हानाचा सामना करणाऱया पुजारा-रहाणेची निवड करावी अन्यथा हिंदुस्थानातील 0-3 अशा पराभवानंतर ऑस्ट्रेलियातही अशाच मानहानीकारक पराभवाची झळ संघाला बसेल, असेही भाकीत क्रिकेटपटूंनी वर्तवले आहे.
…तर सरफराज-राहुलची विकेट
न्यूझीलंडच्या विजयामुळे हिंदुस्थानी क्रिकेटची दहशत संपली आहे. ही दहशत पुन्हा मिळवण्यासाठी कसोटी क्रिकेटचा जगज्जेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला नमवणे आवश्यक आहे. त्यासाठी पुजारा-रहाणेच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांना संघात स्थान देताना सरफराज खान आणि के.एल. राहुल या दोघांचे बळी दिले जाऊ शकतात. सरफराजला न्यूझीलंडविरुद्ध आपली फलंदाजी दाखवण्याची पुरेपूर संधी देण्यात आली, पण पुणे आणि वानखेडे या दोन्ही कसोटीत त्याचा खेळ पूर्णपणे उघडा पडला आहे. त्यामुळे तो संघात असला तरी अंतिम संघात खेळविणे कठीण आहे.
सोशल मीडियावर पुजारा-रहाणेचीच हवा
जर संघात अचानक वॉशिंग्टन सुंदरची निवड केली जाऊ शकते. तर पुजारा-रहाणे यांनाही संघात स्थान मिळू शकते. बीसीसीआयसाठी अशक्य असे काही नाही. संघाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बीसीसीआयने या दोघांच्या निवडीचा निर्णय घेत अपयशी खेळाडूंवर गंभीर कारवाई करावी, असाही सूर उमटत आहे. सोशल मीडियावर पुजारा-रहाणेचीच हवा असल्यामुळे बीसीसीआयने या दोघांची किंवा एकाची निवड केली तरी आश्चर्य वाटणार नसल्याचे क्रिकेटप्रेमी बोलत आहेत. याच दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या दोन्ही मालिकांमध्ये हिंदुस्थानला मालिका विजय मिळवून दिला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List