बारामतीत श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन; सभेची गर्दी पाहून काहीजण बिथरले, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थांबली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या… तलवारी म्यान झाल्या. उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. मतदानासाठी अवघ्या काही तास बाकी असताना राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे पुतणए युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठी शरद पवार खंबीरपणे उभे असून सोमवारी बारामतीमध्ये त्यांच्या उपस्थितीत सांगता सभाही पार पडली. मात्र या सभेनंतर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. प्रचारतोफा थंडावल्यानंतर आणि मतदानाच्या काही तास आधी हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स या शोरूममध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. याबाबत युगेंद्र पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी संबोधित केलेल्या सांगता सभेला आलेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत, असे ते म्हणाले. त्यांचा इशारा नक्की कुणाकडे याबाबत चर्चा रंगली आहे.
सोमवारी रात्री 10 च्या सुमारास शोरूमच्या ऑफिसमधून फोन आला. पोलिसांचे एक पथक आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मी पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. आम्ही काहीही चुकीचे करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांनाही सर्च ऑपरेशन दरम्यान काही सापडले नाही. कदाचित शरद पवारांनी संबोधित केलेल्या सांगता सभेला आलेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत, असे युगेंद्र पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List