मिंधेंच्या दबावाखाली पालिका सदा सरवणकरांवर ‘मेहरबान’, माहीममध्ये कुकर वाटपासाठी वळवला 4.28 कोटींचा विकास निधी!
मिंधे सरकारच्या दबावाखाली पालिकेने मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने ‘मेहरबानी’ केल्याचे ‘आरटीआय’मधून उघड झाले. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सांगण्यावरून पालिकेने विकासकामांचा 4.28 कोटींचा निधी सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघात कुकर वाटपासाठी वळता केल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे.
चांदिवली येथील मिंधे गटाचे आमदार दिलीप लांडे यांचा कुकर वाटप घोटाळा उजेडात आला होता. त्या घोटाळ्याची अजून सखोल चौकशी झाली नसतानाच सदा सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघात कुकर वाटपासाठी पालिकेने विकास निधीचा दुरुपयोग केल्याचे उघड झाले आहे. लांडे यांच्या कुकर घोटाळ्यातील तक्रारदार वकील निखिल कांबळे यांनी आरटीआयमधून अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर पालिकेने माहीम मतदारसंघातील विकास निधी वाटपाचा तपशील उपलब्ध करून दिला. सरवणकर यांच्या सांगण्यावरून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिकेला नागरी कामांकरिता मंजुरी दिलेल्या रुपये 17.50 कोटींमधून 5 कोटींचा निधी पालिकेतील महिला व बालकल्याण विभागाला कुकर वाटपासाठी वळता करण्याचे निर्देश दिले.
मुंबई महापालिका राज्य सरकार आणि भाजपच्या दबावाखाली काम करीत आहे. विकासकामांच्या निधीचा सर्रास दुरुपयोग सुरू असून हा सत्तेचा उघड गैरवापर आणि मुंबईकरांचा विश्वासघात आहे. याप्रकरणी जबाबदार लोकप्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे.
अॅड. निखिल कांबळे, तक्रारदार
सरवणकर यांच्या पत्राच्या आधारे केसरकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आणि जी-उत्तर व जी-दक्षिण प्रभागांतील विकासकामांसाठी मंजूर केलेल्या 17.50 कोटींच्या निधीपैकी 5 कोटींचा निधी कुकर वाटपासाठी देण्याचे निर्देश दिले होते. संबंधित रक्कम प्रत्यक्षात कुकर वाटपासाठी वापरली की नाही याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List